पणजी : गोमंतकीयांनी २०० ते ३०० चौरस मीटर जागेवर घरे बांधली आहेत, त्या जमिनींचे रूपांतरण करण्यासाठीच कलम ‘३९-ए’ आणले होते. सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असून, त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
एका दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सामान्य माणसांची घरे नियमित व्हावीत आणि त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, हाच कलम ‘३९-ए’ लागू करण्यामागचा मुख्य हेतू होता.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विकास, आपले पद आणि राजकीय स्थितीवरही भाष्य केले. आपण नेहमी ‘देश प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ या तत्त्वाने काम केले आहे. देश, राज्य आणि पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन आपली वाटचाल सुरू असल्यानेच, पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे, असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर आपण मुख्यमंत्री झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या आशीर्वादामुळेच हे पद मिळाले, असे सांगून ते म्हणाले की, माझ्याच नेतृत्वाखाली पक्षाने मागील निवडणूक लढवली आणि २० जागांवर विजय मिळवला. पंतप्रधान मोदींच्या कार्यामुळे हे शक्य झाले. आता आगामी निवडणुकीसाठीही माझ्या नेतृत्वाखाली प्रचार सुरू झाला असून, यावेळीही पक्षाला नक्कीच विजय मिळेल.
आपल्या कार्यकाळात राज्यात झालेला विकास आणि कल्याणकारी योजना ‘न भूतो न भविष्यती’ स्वरूपाच्या असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. गोवा ते बंगळुरू दरम्यान ‘वंदे भारत’ रेल्वेचा नुकताच शुभारंभ झाला आहे. राज्यात २ वैद्यकीय महाविद्यालये आणि २ विमानतळ सुरू झाले आहेत. याशिवाय, जुवारी पूल आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर असे अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून, अशी कामे यापूर्वी कधीही झाली नव्हती, असेही ते म्हणाले.
खाण पट्ट्यात राहत असल्याने तिथल्या लोकांच्या स्थितीची आपल्याला जाणीव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शहरात आणि एसीमध्ये बसून पर्यावरणावर बोलणे सोपे असते, पण २०१२ मध्ये खाण उद्योग कोणी बंद पाडला, हे सर्वांना माहीत आहे. आता बंद पडलेला खाण व्यवसाय योग्य मार्गाने पुन्हा सुरू होत असून, जहाजबांधणी (शिपबिल्डिंग) उद्योगानेही उभारी घेतली आहे, असे ते म्हणाले.
बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यात ‘स्किलिंग, रि-स्किलिंग आणि अपस्किलिंग’ प्रक्रिया सुरू झाली असून, ‘आयटीआय’चा दर्जाही उंचावण्यात आला आहे. दहावी आणि बारावी नापास विद्यार्थ्यांचीही आपल्याला चिंता असून, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. सर्वांना सरकारी नोकरी मिळणे शक्य नसल्याने, आता खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याचा विकास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या आमदारांनी स्वतःहून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपण किंवा कुणीही त्यांच्यावर कोणताही दबाव आणलेला नाही, तसेच आपण काँग्रेस किंवा इतर कोणताही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उत्पल पर्रीकर यांना २०२२ च्या निवडणुकीत दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पर्याय पक्षाने दिला होता, मात्र त्यांनी तो नाकारला. त्यांनी जर तो पर्याय स्वीकारला असता, तर आज ते एक मोठे नेते झाले असते. पक्षाचे नेते जे सांगतात ते ऐकणे गरजेचे असते, असा सल्लाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.


