म्हापसा : माजी मंत्री तथा शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी गोवा राज्य अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील जनसंपर्क वाढवण्यासाठी आपण हा राजीनामा दिल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले.
राज्य सरकारने एक वर्षापूर्वी मांद्रेकर यांची गोवा राज्य अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आपण अजून भाजपमध्येच आहोत. आगामी विधानसभा निवडणूक मला लढवायची आहे. त्यामुळे मला शिवोली मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी अधिक वेळ द्यायला हवा. महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार हाताळताना जनसंपर्कासाठी हवा तसा वेळ देता यावा, यासाठी मी राजीनामा दिला असून हेच कारण राजीनामापत्रातही नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती मांद्रेकर यांनी दिली.
दरम्यान, दयानंतर मांद्रेकर हे १९९९ ते २०१२ पर्यंत सलग चार वेळा शिवोली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारच्या काळात त्यांनी वेगवेगळी मंत्रीपदे तसेच पक्षाच्या गाभा समितीचे सदस्य अशी पदे सांभाळली होती. भाजपचे उत्तर गोव्यातील एक मोठे नेते म्हणून त्यांची त्यावेळी पक्षपातळीवर ओळख होती. २०१७ व २०२२च्या निवडणुकीत मांद्रेकर यांचा पराभव झाला व २०२२ च्या काँग्रेस आमदार डिलायला लोबो यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे पक्षातील त्यांच्या प्रभावावर परिणाम झाला होता.
भाजपच्या उमेदवारीवर दावा
यंदाही दयानंद मांद्रेकर यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. परंतु आमदार लोबो यांना पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय मांद्रेकर यांचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.


