चर्चेची वार्ता : कामचुकारांवर कारवाई करा, सर्वांना दोषी धरू नका!

प्रशासनात सुधारणा हवी : कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आवश्यक

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
14th November, 10:55 pm
चर्चेची वार्ता : कामचुकारांवर कारवाई करा, सर्वांना दोषी धरू नका!

पणजी : सरकारी कर्मचारी लोकांची कामे वेळेवर करत नाहीत. कामाच्या वेळा पाळत नाहीत, असे मुख्यमंत्री व जलस्त्रोत मंत्र्यांनी म्हटले आहे. यानंतर दै. ‘गोवन वार्ता’ने आपल्या ‘चर्चेची वार्ता’ या विशेष उपक्रमांतर्गत याबाबत वाचकांची मते मागवली. वाचकांनी यावर विविध मते वर्तवली आहेत. प्रशासनात सुधारणा घडवून आणण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्याबरोबरच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच तराजूत तोलू नका, असेही काहींनी म्हटले आहे. 

जुने कर्मचारी बदलून त्यांच्या जागी नवीन कर्मचारी घ्या. यामुळे बेरोजगारीचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.-  रघुनाथ नाईक

यापूर्वी अमुक कामासाठी किती दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली होती, याचे वेळापत्रक भिंतीवर आहे की गायब झाले आहे, याचा आधी शोध घ्यावा. अंमलबजावणीचा प्रश्न त्यानंतर येतो. कोणताही वरिष्ठ कारवाईची भाषा करू लागला की, त्याची ‘बॉस’कडे चहाडी केली जाते. त्यामुळे ‘तू हवे ते कर, मी मात्र सुरक्षित राहीन’, अशीच वरिष्ठांची भूमिका असते. राजकारणी आता जी नाटके करीत आहेत, ती केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी आणि मतांसाठीच आहेत.- गंगाराम म्हांब्रे

राजीनामा देऊन घरी जाणे हाच सर्वोत्तम मार्ग! हाच नारा आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी वापरा. -अनंत नाईक

ज्या कर्मचाऱ्यांबद्दल बोलले जात आहे, त्याच कर्मचाऱ्यांवर या मंत्र्यांचा हात असतो. निवडणुका जवळ आल्या की हे मंत्री आणि आमदार जमिनीवर दिसू लागतात. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच तराजूत तोलू नका.- प्रशांत गारुडी

आम्ही प्रत्येक कार्यालयाच्या बाबतीत हेच पाहत आलो आहोत. आजपर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही. ओळखपत्रांचे पुढे काय झाले? एकूणच परिणाम शून्य असून, हा सगळा प्रकार केवळ दिखावा ठरला आहे.- प्रेमानंद पागी

प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी केवळ टीका करणे किंवा अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी घेणे पुरेसे नाही. त्यासाठी बायोमेट्रिक हजेरीची काटेकोर अंमलबजावणी, सेवा हमी कायद्यांतर्गत प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा, तसेच ऑनलाइन शासकीय सेवा अधिक सुलभ व नागरिकाभिमुख करणे आवश्यक आहे. अशा कायमस्वरूपी उपाययोजनांमुळे प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेला चालना मिळू शकते.- राजेंद्र पेडणेकर

अनेक सरकारी कर्मचारी आपल्या कामाकडे दुर्लक्ष करतात. याबाबत कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.- सूरज शिरोडकर


हेही वाचा
सर्व पहा