मांद्रेतील शेतजमिनीत परवानगीविना उभारले वीजमीटर, सीसीटीव्ही कॅमेरे, सिमेंटचे खांब

गडेकर कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार : कुळांची संमती न घेतल्याचा दावा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
14th November, 11:22 pm
मांद्रेतील शेतजमिनीत परवानगीविना उभारले वीजमीटर, सीसीटीव्ही कॅमेरे, सिमेंटचे खांब

मांद्रे पोलीस स्थानकात माहिती देताना अविनाश गडेकर, प्रशांत नाईक, अॅड. प्रसाद शहापूरकर व गडेकर मंडळी. (निवृत्ती शिरोडकर)

पेडणे : मांद्रे येथील साळगावकरवाडा परिसरातील गडेकर आणि जोशी कुटुंबीयांच्या जमिनीवर कथित अतिक्रमण करण्याच्या प्रकारावरून निर्माण झालेला वाद आता पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांनी दोन्ही पक्षांशी चर्चा करून उपजिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश मिळेपर्यंत संबंधित जमिनीत कोणत्याही पक्षाने हस्तक्षेप अथवा अतिक्रमण करू नये, अशी सूचना केली आहे.
याप्रकरणी मांद्रेचे माजी सरपंच तथा पंच सदस्य बाळा ऊर्फ प्रशांत नाईक यांनी संबंधित जमीनमालकाने गडेकर आणि जोशी कुटुंबीय तसेच कुळ-मुंडकारांना विश्वासात न घेता जमीन अन्य व्यक्तींना विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. संबंधित जमिनीत परस्पर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, झाडावर वीजमीटर लावून वीजजोडणी घेणे आणि स्थानिकांच्या वापरात अडथळे निर्माण करण्याचे प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिकांच्या जमिनीवरील हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली.
दोन्ही पक्षांना पोलिसांची सूचना
अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन्ही पक्षांशी चर्चा करून उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेश येईपर्यंत जमिनीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित जमिनीची कागदपत्रे, कुळ-मुंडकारांचे हक्क आणि कथित अतिक्रमण याबाबत आता उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयाकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा