मडगाव : बंगळुरू-मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमुळे गोव्याच्या पर्यटन, व्यापार आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील दळणवळण अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. ही रेल्वे सेवा गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. (Bengaluru Madgaon express supports Goa development : Chief Minister Dr. Pramod Sawant).
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बंगळुरू येथून हिरवा झेंडा दाखवून या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त मडगाव रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला मंत्री दिगंबर कामत, कोकण रेल्वे आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. १५ नोव्हेंबरपासून ही रेल्वे नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे गोमंतकीयांच्या वतीने आभार मानले. पंतप्रधानांच्या 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेनुसार गोवा सरकारने 'विकसित गोवा २०३७' हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी राज्यातील रस्ते, रेल्वे आणि बंदरांसह पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. गोवा-मुंबई वंदे भारतनंतर आता बंगळुरू-मडगाव वंदे भारत सुरू झाल्याने राज्याच्या संपर्क व्यवस्थेला नवी गती मिळेल, असे ते म्हणाले.
नव्या रेल्वे सेवेचा लाभ केवळ पर्यटन क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नसून व्यापार आणि उद्योग क्षेत्रालाही होणार आहे. गोव्यातून मुंबई आणि बंगळुरू येथे विविध उत्पादनांचा व्यापार करणाऱ्या उद्योजकांना तसेच बंगळुरूमध्ये कार्यरत असलेल्या गोव्यातील आयटी क्षेत्रातील तरुणांना या रेल्वेमुळे जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वेवरील प्रवाशांची संख्या वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भविष्यात कोकण रेल्वेमार्गे मोपा विमानतळाला थेट जोडणी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच सिंधुदुर्ग ते कारवारदरम्यान दिवसातून दोन ते तीन वेळा वेगवान शटल रेल्वे सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे काणकोण आणि मडगाव येथून मोपा विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्याऐवजी रेल्वेने जलद प्रवास करता येईल.
याशिवाय, मये येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येत असून, त्याचा दीर्घकालीन फायदा सत्तरी आणि डिचोली तालुक्यातील नागरिकांना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि फूड कोर्ट यांसारख्या आधुनिक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनाही विमान प्रवासाप्रमाणे आरामदायी आणि दर्जेदार अनुभव मिळावा, हा या सुविधांमागील उद्देश असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


