आजारी पत्नीची साथ सोडवेना; अपहरणाची चिठ्ठी टाकत विमान रोखले!

कोलकातातील घटनेने खळबळ; कॅन्सरग्रस्त प्रवाशाला अटक : आजारी पत्नीला एकटे सोडून परदेशात नोकरीसाठी जाण्याची इच्छा होत नसल्याने एका ५६ वर्षीय कॅन्सरग्रस्त इसमाने चक्क विमान अपहरणाची खोटी धमकी दिल्याची धक्कादायक घटना कोलकाता विमानतळावर घडली. विमानाच्या स्वच्छतागृहात अपहरणाची धमकी देणारी चिठ्ठी ठेवून त्याने विमानाचा प्रवास रद्द करण्याचा प्रयत्न केला. (A 56-year-old cancer patient has been arrested for allegedly planting a hoax hijack threat onboard an Air India plane)

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
आजारी पत्नीची साथ सोडवेना; अपहरणाची चिठ्ठी टाकत विमान रोखले!

कोलकाता : आजारी पत्नीला एकटे सोडून परदेशात नोकरीसाठी जाण्याची इच्छा होत नसल्याने एका ५६ वर्षीय कॅन्सरग्रस्त इसमाने चक्क विमान अपहरणाची खोटी धमकी दिल्याची धक्कादायक घटना कोलकाता विमानतळावर घडली. विमानाच्या स्वच्छतागृहात अपहरणाची धमकी देणारी चिठ्ठी ठेवून त्याने विमानाचा प्रवास रद्द करण्याचा प्रयत्न केला. (A 56-year-old cancer patient has been arrested for allegedly planting a hoax hijack threat onboard an Air India plane)  पार्थ प्रतिम नंदी असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकारामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली आणि कोलकाता-मुंबई विमानाला सात तासांहून अधिक विलंब झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI 2772 हे विमान बुधवारी सकाळी १०.३० वाजता कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, उड्डाणापूर्वी विमानाच्या स्वच्छतागृहात विमान अपहरण करण्याची धमकी देणारी चिठ्ठी आढळली. यानंतर वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) अपहरणाचा अलर्ट दिला.

सुरक्षेच्या दृष्टीने विमान तातडीने स्वतंत्र ठिकाणी उभे करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विमानाची कसून तपासणी केली. तसेच विमानातील १०५ प्रवाशांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान पार्थ प्रतिम नंदी याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

पत्नीला सोडून जाण्याची मनाची तयारी होईना!

पोलीस चौकशीत नंदी याने धमकीची चिठ्ठी आपणच ठेवल्याची कबुली दिली. तो कर्करोगाने ग्रस्त असून मुंबईमार्गे परदेशात नोकरीसाठी जाणार होता. मात्र, आजारी पत्नीला एकटे सोडून परदेशात जाण्याची मानसिक तयारी होत नसल्याची जाणीव त्याला शेवटच्या क्षणी झाली. त्यामुळे घरी परतण्याचा निर्णय घेतला. विमानाचा प्रवास रद्द व्हावा, या उद्देशाने त्याने विमानाच्या स्वच्छतागृहात पांढऱ्या कार्डवर अपहरणाची धमकी लिहून ठेवली.

आपण त्यावेळी मानसिकदृष्ट्या योग्य अवस्थेत नव्हतो, असेही त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून धमकी लिहिण्यासाठी वापरलेल्या कार्डसारखी आणखी काही पांढरी कार्डे जप्त करण्यात आली आहेत. हस्ताक्षराच्या न्यायवैद्यक तपासणीतही धमकीची चिठ्ठी नंदी यानेच लिहिल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर आवश्यक सुरक्षा तपासणी आणि परवानग्या पूर्ण झाल्यावर विमान अखेर सायंकाळी ५.३८ वाजता कोलकात्याहून मुंबईकडे रवाना झाले. नंदी याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा