गोवा पोलिसांकडून ८.२१ कोटींच्या आंतरराज्य सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

१६ राज्यांतून २४ जणांना अटक; ३७ सायबर गुन्ह्यांचा छडा : ‘सायबर व्हिजिल २.०’ या विशेष आंतरराज्य मोहिमेंतर्गंत देशातील १६ राज्यांत एकाच वेळी धडक कारवाई करून २४ संशयित आरोपींना अटक केली. या मोहिमेत ३७ सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला तर तब्बल ८ कोटी २१ लाख ६७ हजार ९९९ रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा तपास लावण्यात आला आहे. (Goa Police bust interstate cyber fraud worth 8.21 crore)

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोवा पोलिसांकडून ८.२१ कोटींच्या आंतरराज्य सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

पणजी : सायबर गुन्हेगारीचे जाळे देशभर पसरत असतानाच गोवा पोलिसांनी मोठी कारवाई करत सायबर गुन्हेगारांना दणका दिला आहे. ‘सायबर व्हिजिल २.०’ या विशेष आंतरराज्य मोहिमेंतर्गंत देशातील १६ राज्यांत एकाच वेळी धडक कारवाई करून २४ संशयित आरोपींना अटक केली.  या मोहिमेत ३७ सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला तर तब्बल ८ कोटी २१ लाख ६७ हजार ९९९ रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा तपास लावण्यात आला आहे. (Goa Police bust interstate cyber fraud worth 8.21 crore)

उत्तर गोवा, दक्षिण गोवा जिल्हा पोलीस आणि सायबर क्राईम पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत आयुष आणि सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली १६ राज्यांत ४३ पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. या कारवाईत २४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली. २० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या.

सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी कामगिरी

 या वर्षात आतापर्यंत गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने आर्थिक फसवणुकीविरोधात मोहीम उघडली.  संशयास्पद फसवणुकीच्या खात्यांमध्ये लियन मार्किंगद्वारे १५.९४ कोटी रुपये सुरक्षित करण्यात आले आहेत. तसेच गैरवापर होण्याची शक्यता असलेली १,७१७ सिमकार्ड, ७२२ सोशल मीडिया खाती आणि ८१४ बनावट संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत.

सायबर फसवणुकीसंदर्भातील ३०६ झिरो ई-एफआयआरचे नियमित गुन्ह्यांमध्ये रूपांतर करून तपास सुरू करण्यात आला. तक्रार निवारण यंत्रणेअंतर्गत ६४४ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.  एमआरएम पोर्टलच्या माध्यमातून सायबर फसवणुकीतील पीडितांना १ कोटी ९४ लाख ३३ हजार ६८२ रुपये परत मिळवून देण्यात आले. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केवळ कारवाईच नव्हे, तर जनजागृतीवरही गोवा पोलिसांनी भर दिला आहे.

सायबर गुन्ह्यांविरोधातील ही मोहीम आयजी क्राईम  वेद प्रकाश सूर्या यांच्या देखरेखीखाली, पोलीस महानिरीक्षक केशव राम चौरासिया आणि पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

१९३० वर संपर्क साधावा

सायबर गुन्हेगारांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण कायम ठेवणार असल्याचे गोवा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहावे, कोणालाही ओटीपी, पिन किंवा बँकिंगविषयक गोपनीय माहिती देऊ नये. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा