राज्यातील सरकारी खात्यांत ६,७८२ पदे रिक्त

पोलीस खात्यात सर्वाधिक १,५९६ जागा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th November, 10:06 pm
राज्यातील सरकारी खात्यांत ६,७८२ पदे रिक्त

विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सरकारने प्रशासकीय कामांचा धडाका सुरू केला असला, तरी सध्या राज्यातील विविध सरकारी खात्यांमध्ये तब्बल ६,७८२ पदे रिक्त आहेत. यापैकी पोलीस खात्यात सर्वाधिक १,५९६ पदे असल्याची माहिती सरकारी खात्यांच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

कर्मचारी भरती आयोगामार्फत जाहिरात देण्यात आलेली पदे भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या आयोगाकडून आणखी काही पदांसाठी नव्याने जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. याशिवाय, गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. पदे भरण्याची ही प्रक्रिया सुरू असूनही सर्व सरकारी खाती, महामंडळे तसेच स्वायत्त संस्थांमध्ये मिळून ६,७०० हून अधिक पदे अद्याप रिक्त आहेत.

खातेनिहाय रिक्त पदांची आकडेवारी

विविध खात्यांतील रिक्त पदांवर नजर टाकल्यास पोलीस खात्यात सर्वाधिक १,५९६ पदे रिक्त आहेत. त्यानंतर वीज खात्यात ९००, पेयजल खात्यात ४२४, सार्वजनिक बांधकाम खात्यात ३२७ आणि आरोग्य खात्यात ३२६ पदे रिक्त आहेत. तसेच शिक्षण खात्यात २८२, कदंब महामंडळात २७५, उच्च शिक्षण संचालनालयात १९४, कला आणि संस्कृती खात्यात १३५, सीसीपीमध्ये १०२, तर पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खात्यात ९७ पदे रिक्त आहेत.

सरकारी खाते / संस्थारिक्त पदे
पोलीस खाते१,५९६
वीज खाते९००
पेयजल खाते४२४
सार्वजनिक बांधकाम खाते३२७
आरोग्य खाते३२६
शिक्षण खाते२८२
कदंब महामंडळ२७५
उच्च शिक्षण संचालनालय१९४
कला आणि संस्कृती खाते१३५
सीसीपी१०२
पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा खाते९७

शिकाऊ उमेदवारांना संधी

विविध खात्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासोबतच लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी शिकाऊ उमेदवारांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नोव्हेंबरपर्यंत २,६५७ शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ‘एलडीसी’, ‘एमटीएस’ तसेच व्यावसायिक पदांचा समावेश आहे. विविध खात्यांमध्ये भरती होणारे हे शिकाऊ उमेदवार सरकारी कर्मचाऱ्यांचीच कामे करतात.

कोमुनिदादमध्ये ९४ जागांवर भरती

उत्तर गोवा तसेच दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासनासाठी ‘एलडीसी’, ‘यूडीसी’ आणि ‘एमटीएस’ मिळून ९४ पदांसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. यामध्ये ‘यूडीसी’ची ११, ‘एलडीसी’ची ७४, तर ‘एमटीएस’ची ९ पदे आहेत.

यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आहे. अर्ज सादर झाल्यानंतर परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा