पणजी : गोव्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना प्रचंड वेग आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना आकार मिळत आहे. भाजप आणि मगो पक्षाच्या युतीबाबतची बोलणी सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यात असून, युतीचा आणि जागावाटपाचा अंतिम निर्णय आगामी ३० तारखेपर्यंत किंवा १५ डिसेंबरपर्यंत फायनल होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती मगो पक्षाचे प्रमुख दीपक ढवळीकर यांनी दिली आहे. दोन्ही पक्षांमधील समन्वय आणि स्पष्टतेने सध्या काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी कमळ हातात धरत भाजपमध्ये रितसर घरवापसी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, माजी आमदार दयानंद सोपटे यांच्यासह अनेक प्रमुख मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पक्ष आपल्यावर जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडण्यास आपण पूर्णपणे तयार असून उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असेल, अशी प्रतिक्रिया प्रा. पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी निवडणुकीत मांद्रेत कमळ नक्कीच फुलणार असून ३० जागांवर विजय मिळवणे निश्चित आहे. पक्षापासून काहीसे दुरावलेल्या भाजपच्या मांद्रेतील कार्यकर्त्यांची जुनी खंत यामुळे दूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. पार्सेकर यांच्या या प्रवेशामुळे उत्तर गोव्यातील राजकीय समिकरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांचे मगोप आमदार जीत आरोलकर यांनी तीव्र शब्दांत खंडण केले आहे. आपण अजूनही मगो पक्षाचे आमदार असून प्रामाणिकपणे पक्षाचेच काम करत आहोत, असे स्पष्ट करत त्यांनी सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगितले. आपल्याला पक्ष बदलण्याचा कोणताही विचार नसून सध्याचा आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण करून जनतेची सेवा करायची आहे, असे त्यांनी सांगितले. युतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, दोन पक्षांमध्ये जब युती होते तेव्हा युतीचा धर्म पाळणे हे प्रत्येकाचे मुख्य कर्तव्य असते. युतीमध्ये मगोपला तिकीट मिळाल्यास भाजपने आणि भाजपने मिळवल्यास मगोपने एकमेकांना १०० टक्के सहकार्य करणे आवश्यक असते, असे त्यांनी सांगितले. गोव्यातील या नवनवीन राजकीय घडामोडींमुळे आगामी निवडणुकांची रंगत वाढली आहे.
दरम्यान, शनिवारी ३१ ऑक्टोबर पणजी येथे मगो पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली होती. या बैठकीत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर आणि जीत आरोलकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार शिरोडा मतदारसंघावर दावा सांगतानाच, भाजपसोबत युती कायम ठेवण्यासाठी मगो पक्ष योग्य ती तडजोड करेल. मात्र, युती तुटल्यास आम्ही स्वतंत्र मार्ग स्वीकारण्यास तयार आहोत, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
शिरोडा मतदारसंघावर दावा
शिरोडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणे हे युतीवर अवलंबून असून, भाजपसोबतची युती तुटल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू. मगोने शिरोडा मतदारसंघ निवडणुकीसाठी निश्चित केला असून, आपण शिरोड्यात यावे अशी विनंती करणारी अनेक पत्रे कार्यकर्त्यांनी लिहिली आहेत, असे ढवळीकर बैठकीनंतर म्हणाले.
पाच जागा जिंकण्याचा विश्वास : ढवळीकर
गेली पाच वर्षे सोबत राहिल्यामुळे भाजपसोबत युती व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. शक्य तितकी तडजोड करून युतीत राहण्याचा प्रयत्न करू, मात्र तसे न झाल्यास वेगळे होण्याचा दुसरा पर्याय खुला आहे. मगोची १६ मतदारसंघांत तयारी सुरू असून, युती असो किंवा नसो मगो स्वबळावर पाच मतदारसंघ जिंकेल, असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.
संसदीय मंडळ घेणार निर्णय
जीत आरोलकर हे मगोचे आमदार असून, त्यांना उमेदवारी देण्याबाबतचा विचार संसदीय मंडळ निश्चितपणे करेल. मगोच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून संसदीय मंडळाची स्थापना केली जाईल आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे मंडळ दुसऱ्या दिवशी युतीसंदर्भात आपला निर्णय घेईल, असे ढवळीकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पाच ठराव मंजूर
या सर्वसाधारण बैठकीत पाच ठराव मंजूर करण्यात आले असून, केंद्रीय समितीचा कार्यकाळ तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय समिती आणि कार्यकारी समितीला अधिकार प्रदान करण्यात आले असून, पक्षाच्या महिला विभागाचीही स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली.


