१९ वर्षांखालील आशिया चषक विजयात गोव्याच्या सुपुत्राचा सिंहाचा वाटा

चिगुरुपती व्यंकटच्या अष्टपैलू खेळाने भारताला मिळवून दिले ऐतिहासिक विजेतेपद

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
14th November, 08:31 pm
१९ वर्षांखालील आशिया चषक विजयात गोव्याच्या सुपुत्राचा सिंहाचा वाटा

पणजी : भारताने १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा एका विकेटने रोमहर्षक पराभव करत नवव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात गोव्याचा प्रतिभावान खेळाडू चिगुरुपती व्यंकटने बजावलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरली. त्याच्या प्रभावी गोलंदाजी आणि महत्त्वपूर्ण धावांमुळे भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या ३३८ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार लक्ष्य रायचंदानीने या महाआव्हानात्मक डावात शानदार ८० धावांची खेळी केली. त्यानंतर खालच्या क्रमाने फलंदाजी करताना मोहित उल्वाने विजयाची विनिंग रन काढत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तसेच मनाल चौहान याचे योगदानही मोलाचे ठरले.
मूळच्या आंध्र प्रदेशमधील मात्र गोव्याकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू चिगुरुपती व्यंकट याने आपल्या जिद्दीच्या आणि उत्कृष्ट खेळाच्या बळावर भारतीय युवा क्रिकेट वर्तुळात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
चिगुरुपती व्यंकटने २०२२ मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीमधून गोव्यासाठी पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. गोव्याकडून खेळताना त्याने १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील गटात सातत्यपूर्ण कामगिरी केली. कूच बिहार ट्रॉफी, विनू माकंड ट्रॉफी आणि केएससीए क्वाड्रँगुलर मालिका यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपल्या अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवली आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये शेकडो धावा आणि बहुमूल्य बळी टिपत त्याने राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
गोव्याच्या क्रिकेट वर्तुळात फलंदाजीत राहुल द्रविड यांच्या संयमाचा आदर्श आणि गोलंदाजीत इशांत शर्मा यांच्या आक्रमक शैलीचा कित्ता गिरवणारा व्यंकट हा एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्या या कठोर परिश्रमामुळेच त्याला भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळाले.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात निर्णायक कामगिरी
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताने विजय मिळवला, ज्यामध्ये व्यंकटच्या अष्टपैलू कौशल्याने सामना भारताच्या बाजूने झुकवला. पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडताना व्यंकटने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ३ महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या स्पेलमुळेच पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येपासून रोखणे शक्य झाले. भारताची धावगती खालावलेली असताना आणि विजय कठीण असताना, व्यंकटने खालच्या क्रमाने येऊन नाबाद ११ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या षटकांत त्याने मोलाची साथ देत संघाला ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.
भविष्यातील मोठी आशा
पदार्पणापासूनच सातत्याने चमकदार कामगिरी करणारा १८ वर्षीय चिगुरुपती व्यंकट हा भविष्यात भारतीय वरिष्ठ संघासाठी लाल चेंडूच्या (रेड बॉल) क्रिकेटमध्ये खेळण्याचे स्वप्न बाळगून आहे. त्याच्या या उल्लेखनीय प्रवासामुळे गोव्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, तो गोव्याचा भावी क्रिकेटचा तारा म्हणून पाहिला जात आहे.

जीसीएकडून अभिनंदन
१९ वर्षांखालील आशिया चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर एका गडी राखून रोमांचक विजय मिळवला. या चुरशीच्या सामन्यात गोव्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू चिगुरुपती वेंकट याने केलेल्या प्रभावी अष्टपैलू कामगिरीबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) त्याचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दबावपूर्ण अंतिम सामन्यात वेंकटने गोलंदाजीत ३ बळी टिपले, तर फलंदाजीत अवघ्या ८ चेंडूंत नाबाद ११ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्यातील गुणवंत खेळाडूंची क्षमता त्याच्या या खेळीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. जीसीएचे अध्यक्ष महेश देसाई आणि सचिव तुळशीदास शेट्ये यांनी वेंकटचे विशेष कौतुक केले आहे. दबावाखाली फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत वेंकटने केलेली कामगिरी त्याच्या मेहनतीचे आणि गुणवत्तेचे प्रतीक आहे. यामुळे गोव्यातील युवा क्रिकेटपटूंना नक्कीच प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील युवा खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी जीसीए सदैव कटिबद्ध असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.