हॉटेल रेटिंगच्या कामाचे आमिष दाखवून महिलेची साडेआठ लाखांची फसवणूक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
18th November, 11:49 pm
हॉटेल रेटिंगच्या कामाचे आमिष दाखवून महिलेची साडेआठ लाखांची फसवणूक

मडगाव : घरबसल्या हॉटेल रेटिंगचे काम करून भरघोस कमाई करण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी आके येथील ४२ वर्षीय महिलेची ८ लाख ५० हजार ५३२ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कविता वेळीप यांनी दिलेल्या तक्रारीवरून मडगाव पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तींनी इन्स्टाग्रामवर हॉटेल रेटिंगच्या कामाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या कामाच्या माध्यमातून घरबसल्या चांगले उत्पन्न मिळवता येईल, असे आमिष दाखवण्यात आले होते. या जाहिरातीला प्रतिसाद दिल्यानंतर वेळीप यांना एका टेलिग्राम समूहात सहभागी करून घेण्यात आले.

सुरुवातीला विविध हॉटेलना रेटिंग दिल्याबद्दल त्यांना मानधन देण्यात आले. त्यामुळे त्यांचा संबंधितांवरील विश्वास वाढला. त्यानंतर बनावट आकडेवारीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर सुमारे आठ लाख रुपयांचा नफा जमा झाल्याचे भासवण्यात आले.

मात्र, ही रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी विविध शुल्क आणि कर भरावे लागतील, असे सांगून संशयितांनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. वारंवार रक्कम भरूनही दाखवण्यात आलेला नफा किंवा गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक स्वदेश देसाई पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा