डिचोली : क्रूझ जहाजावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून साखळी येथील २८ वर्षीय तरुणाची १ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील अमित मोडक (वय ५४) याला डिचोली पोलिसांनी अटक केली. त्याला डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत देण्यात आली.
सौरभ सतीश च्यारी (रा. प्रतापनगर, हरवळे-साखळी) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराची समीर नामक मित्रामार्फत आरोपीशी ओळख झाली होती. क्रूझ जहाजावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देताना आरोपीने आपण मुंबईतील एअरबोर्न रिक्रूटिंग प्रा. लि. या कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवले होते.
आरोपीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आपली वैयक्तिक कागदपत्रे त्याच्याकडे दिली. नोकरी प्रक्रियेचे शुल्क, व्हिसा, विमान तिकीट आणि वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली आरोपीने ८ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या वेळी सुमारे १ लाख १३ हजार रुपये घेतले. नोकरीसाठी आवश्यक प्रक्रिया असल्याचे सांगून आरोपीने तक्रारदाराला मुंबईतील अंधेरी येथील एनएम मेडिकल येथे वैद्यकीय तपासणीसाठीही नेले होते.
मात्र, पैसे घेऊनही आरोपीने नोकरी मिळवून दिली नाही. पैसे परत मागण्यासाठी संपर्क साधला असता त्याने तक्रारदाराचे फोन घेणे टाळले. तसेच आरोपीने अशाचप्रकारे अन्य काही व्यक्तींचीही फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.


