हिवाळ्यात केसांतील कोंडा कसा कमी करावा? हे आहेत सोपे घरगुती उपाय

हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे केसांमध्ये होणारा कोंडा, खाज आणि केसगळती कमी करण्यासाठी घरगुती उपाय, आहार आणि काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती वाचा

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
हिवाळ्यात केसांतील कोंडा कसा कमी करावा? हे आहेत सोपे घरगुती उपाय

हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या हवामानामुळे त्वचेसह केसांशी संबंधित विविध समस्या उद्भवतात. या ऋतूत टाळूचा नैसर्गिक ओलावा कमी झाल्याने केसांमध्ये पांढरा कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. डोक्याला सतत खाज येणे, कपड्यांवर पांढरे पापुद्रे पडणे आणि केसांचे सौंदर्य कमी होणे, अशी लक्षणे या काळात प्रकर्षाने जाणवतात. याकडे दुर्लक्ष केल्यास टाळूला संसर्ग होण्याचा धोका संभवतो तसेच केस कमकुवत होऊन गळण्याची समस्याही वाढू शकते आणि केसांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी असते आणि त्यातल्या त्यात आपल्याच काही सवयींमुळे कोंड्याची समस्या अधिक तीव्र होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी अतिगरम पाण्याने केस धुणे, रसायनेयुक्त शॅम्पू किंवा हेअर जेलचा वापर करणे आणि डोक्यावर सतत टोपी घालणे, यामुळे टाळूवरील कोरडेपणा वाढतो. तसेच पुरेसे पाणी न पिणे, सूर्यप्रकाशाचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती या घटकांमुळेही टाळूवर बुरशी वाढून कोंडा होऊ शकतो.

या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध घरगुती उपायांचा अवलंब करता येतो. कोमट खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाच्या तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज केल्यास टाळूला ओलावा मिळतो. दोन चमचे खोबरेल तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळून टाळूला लावल्यास आणि अर्ध्या तासाने सौम्य शॅम्पूने केस धुतल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय, पाणी आणि ॲपल सायडर व्हिनेगर समप्रमाणात घेऊन फवारणी केल्यास आणि दहा मिनिटांनी केस धुतल्यास टाळूचा ‘पीएच’ समतोल राखला जातो. अर्धा कप दह्यात थोडे मध मिसळून केसांच्या मुळांना लावणे आणि अर्ध्या तासाने धुणे, यामुळे टाळूला पोषण मिळते.

कोरफडीचा ताजा गर केसांच्या मुळांवर लावून अर्ध्या तासाने केस धुतल्यास खाज आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मेथी दाण्यांची बारीक पेस्ट तयार करून ती केसांना लावल्यास आणि ठराविक वेळानंतर धुतल्यास कोंडा तसेच केसगळती कमी होण्यास हातभार लागतो. टी ट्री ऑईल थेट न लावता ते खोबरेल तेल किंवा नियमित शॅम्पूमध्ये काही थेंब मिसळून वापरल्यास त्यातील बुरशीविरोधी गुणधर्मांमुळे कोंडा आटोक्यात येतो.

बाह्य उपायांसोबतच शरीराचे आतून पोषण होणे आवश्यक असते. दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि ताज्या फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. टाळू आणि शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. योग्य स्वच्छता, संतुलित आहार आणि घरगुती उपायांनी कोंड्याची समस्या नियंत्रणात येऊ शकते. मात्र, या उपायांनंतरही समस्या कायम राहिल्यास किंवा असह्य खाज जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरते.

वरील लेख केवळ माहितीपर आहे. आयोग्याशी निगडीत समस्या उद्भवल्यास तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.