उठा उठा दिवाळी आली... बालपणातील आठवणींची वेळ झाली!

एका निसर्गप्रेमी व्यक्तीने रानमेव्यातील हसोळीच्या झाडाला लागलेल्या फळांचा सुंदर फोटो स्टेटसला ठेवला आणि मी थेट माझ्या बालपणातील दिवाळीत जाऊन पोहोचले.

Story: आठवणींचे पंचामृत |
06th November, 08:17 pm
उठा उठा दिवाळी आली... बालपणातील आठवणींची वेळ झाली!

दि​वाळीची सुट्टी लागली की आमचा पहिला उद्योग म्हणजे शेजारच्या माईकडे गडी असलेल्या नारग्या-गोपाळग्यांना शोधणे. नारायण आणि गोपाळ ही किती छान नावे; पण तेव्हा त्यांना अशाच लाडक्या नावांनी हाक मारली जायची. ते बांबूच्या बारीक नळीपासून आमच्यासाठी चिपनळी बनवून द्यायचे. हसोळीचे एक फळ नळीत टाकायचे आणि वरून दुसरे फळ घालून जोरात ठोकायचे की 'फट्' असा आवाज होऊन पहिली गोळी बाहेर पडायची. चुकून कोणाला लागली तर लाल फोड येऊन पाठीवर वळ उठायचे; तरीही त्या खेळाची मजा काही औरच होती.

त्यांच्याकडे एक सुटकेस असायची. आम्ही हट्ट करून ती उघडायला लावायचो. त्यात भारतातील प्रसिद्ध ठिकाणांचे आणि हिरो-हिरॉईनचे फोटो असायचे. 'मला एक दे, मला एक दे' करत ते फोटो मिळवण्यातही आम्हाला मोठा आनंद वाटायचा.

एरवी लाईफबॉय साबणाने आंघोळ करणारी आम्ही मुले; पण दिवाळीत मात्र वर्षातून एकदाच मोती साबणाने अभ्यंगस्नान व्हायचे. प्रत्येकाच्या घरी बांबूच्या काठीला स्वतः बनवलेला आकाशकंदील बांधून उंच लावला जायचा.

दिवाळीच्या आठ दिवस आधीपासूनच तयारी सुरू व्हायची. विकत आणलेला भात फुगत घालायचा आणि पहाटे बाबांसोबत शेजारच्या गावात पोहे कांडायला जायचे. भट्टीत भात भाजताना कोंडा टाकण्यास आम्हीही मदत करायचो. ते गावठी पोहे चहात घालून खाण्याची मजा काही औरच होती. आजही मला तसेच पोहे आवडतात. आई आणि सासूबाई माझ्यासाठी मुद्दाम पोहे आणून ठेवतात; पण स्वतः जाऊन कांडून आणलेल्या पोह्यांची चव काही वेगळीच होती.

वर्षातून एकदाच बाबांना बोनस मिळायचा आणि त्यातून आम्हाला नवीन कपडे मिळायचे. दिवाळीच्या आदल्या रात्री नरकासुर यायचा. दोन-तीन गावांसाठी एकच नरकासुर ट्रकमधून आणला जायचा. आई-बाबा आम्हाला झोपेतून उठवून तो दाखवायला न्यायचे. वेशीवर नेऊन त्याचे दहन केले जायचे.

पहाटे वाडीत कोण आधी उठतो, याची स्पर्धा असायची. कडाक्याच्या थंडीत आंघोळ करून, "गोविंदा गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा" असे ओरडत तुळशीपाशी कारिट फोडायचे. त्या आवाजाने सगळी वाडी जागी व्हायची.

आमचा फराळ साधाच असायचा. गोड पोहे, तिखट पोहे, उकडलेली रताळी, आईचे चणापिठाचे गुळाच्या पाकातील लाडू, खोबऱ्याच्या वड्या आणि शेजारच्या वहिनींनी दिलेल्या शंकरपाळ्या व चकली. चकलीला काटे कसे येतात, हे माझे बालपणीचे न सुटलेले कोडे होते. चकली बनवताना पाहिल्यावरच ते सुटले!

सुट्टीत झाडाखाली घर बांधून रांधू-मांडू खेळायचो. दगडाची चूल, करवंटीची भांडी, घरातून हळूच आणलेले तांदूळ, पानांची भाजी आणि खापरी झरवून केलेली लाल आमटी... ते खोटे-खोटे जेवण आणि त्या घरातली झोप म्हणजे स्वर्गसुख होते.

सकाळी धावणे, सायकलिंग, लगोरी, आट्यापाट्या, लंगडी, विटी-दांडू, लपाछपी, आंधळी कोशिंबीर असे खेळ रंगायचे. आम्ही सगळे मिळून झाडांखालचा पालापाचोळा आणि आजूबाजूचा कचरा गोळा करून शेकोटी करायचो. प्रत्येकाने त्यात सहभागी व्हायचे, असा नियमच होता. त्यामुळे परिसरही स्वच्छ व्हायचा. आज मोठमोठ्या इमारती आणि रस्त्यांच्या गर्दीत ती कडाक्याची थंडी आणि शेकोटीची ऊब हरवून गेली आहे.

संध्याकाळी आईला लाकडे आणायला मदत करताना पिशवीत पिकलेल्या हसोळ्या भरून आणायचो. त्या आंबट-गोड हसोळ्या खाणे, हिरवी चिपनळी आणि डोक्यावर छोटा भार आणणे, हेही आमच्या दिवाळीचे भाग होते. अभ्यासही चुकायचा नाही. रोज पाच ओळी मराठी आणि इंग्रजी शुद्धलेखनाचा सराव व्हायचा.

एकदा दिवाळीला मामाकडे मुंबईला गेले होते. गावाकडचा फराळ, पोहे आणि रताळी तिथे मिळाली नाहीत. मामी म्हणाली, "आम्ही इकडे आधी फराळच खातो, पोहे नंतर कधीतरी बनवतो." त्या वर्षी मला दिवाळी आल्यासारखी वाटलीच नाही.

तेव्हा देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा तुळशीचे लग्न यांची माहिती नव्हती. पाच दिवसांचा सण आणि सुट्टीची मजा एवढीच आमची दिवाळी होती.

आपल्या संस्कृतीत दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा उत्सव आहे. प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत आगमनानिमित्त दीपोत्सव साजरा झाला, तर भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतरही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष्मीपूजन, बंधुभाव, निसर्गाबद्दलची कृतज्ञता आणि 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना या सणातून जपली जाते.

आज दिवाळीचे स्वरूप बदलले आहे. नरकासुरांच्या स्पर्धा, पहाटे पाच वाजता होणारे दहन आणि त्यानंतर झोपून राहणारी माणसे पाहून वाईट वाटते. मात्र काही ठिकाणी नरकासुरदहनानंतर रांगोळी काढून पुरुषांचे स्वागत करणे, त्यांना ओवाळणे आणि एकत्र फराळ करणे अशा सुंदर प्रथाही पाहायला मिळतात.

प्रत्येकाला आपले बालपण आठवते, कारण तेव्हा मनसोक्त बागडणे, खेळणे आणि आनंद घेणे एवढेच माहीत असते. मोठेपणी जबाबदाऱ्या वाढतात आणि मन नकळत पुन्हा बालपणाकडे धाव घेते.

शेवटी एवढेच म्हणेन...

दिवाळी सण मोठा,

नाही आनंदाला तोटा!