ये रे ये रे पावसा रुसलास का...

घनराजाच्या कमी झालेल्या वर्षावातून पाणीटंचाईचे गंभीर वास्तव समोर येते. निसर्गाचा ऱ्हास, मानवी स्वार्थ आणि पाण्याचा अपव्यय यांवर अंतर्मुख करणारा संवाद.

Story: मनातलं |
30th October, 09:57 pm
ये रे ये रे पावसा रुसलास का...

घनराजा, तू दरवर्षी ठरलेल्या वेळी येतोस. काळे ढग दाटतात, विजा कडाडतात, मातीचा सुगंध दरवळतो आणि तुझ्या सरींनी सृष्टीत चैतन्य फुलते. शेतकरी सुखावतो, धरती हिरवीगार होते. पण यंदा तू आलास खरा, मात्र तुझ्या सरींमध्ये पूर्वीसारखा जोर नव्हता. तहानलेल्या धरतीची तहान भागलीच नाही. सांग ना घनराजा, या सृष्टीने तुझा काय अपराध केला?

घनराजा, तुझ्या रुसव्याला आम्हीच कारणीभूत आहोत. जंगलांची कत्तल, डोंगरांचे उत्खनन, जमिनीचे सपाटीकरण आणि सिमेंट-काँक्रीटची जंगले उभी करण्याच्या हव्यासाने माणसाने निसर्गाचा समतोल बिघडवला. निसर्गाचा अमर्याद उपभोग घेणाऱ्यांच्या चुकीची झळ मात्र सामान्य माणसाला सोसावी लागत आहे.

माणूस पाण्याचे महत्त्व विसरला आहे. पाण्याविना शेती, अन्ननिर्मिती आणि जीवन शक्य नाही, हे माहीत असूनही आम्ही पाण्याचा अपव्यय करतो. गाड्या-अंगणे धुणे, नळ उघडे ठेवणे अशा सवयी सहज स्वीकारतो. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे, याची जाणीव आम्हाला कधी होणार?

आज विहिरींची पाणीपातळी खालावत आहे. कूपनलिका, तलाव आणि बंधारे कोरडे पडू लागले आहेत. उद्या नळातून पाणी येणे बंद झाले आणि एका घागरीसाठी मैलोनमैल चालावे लागले, तर आमच्या प्रगतीला काय अर्थ उरेल?

पाणीटंचाईमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. स्वच्छ पाणी न मिळाल्याने जलजन्य आजारांचा धोका वाढतो. लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे हाल होतात. पाण्यासाठी रांगा, वाद आणि संघर्ष निर्माण होतात. आज सहज मिळणाऱ्या पाण्याची किंमत उद्या कळेल, तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल.

घनराजा, तुझी सर्वाधिक प्रतीक्षा शेतकरी करतो. पावसाच्या भरवशावर तो पेरणी करतो, कर्ज काढतो आणि चांगल्या पिकाची स्वप्ने पाहतो. पण तू अल्पकाळ बरसून निघून गेलास, तर पिके करपतात, कर्जाचा भार वाढतो आणि त्याच्या कुटुंबाचे भविष्य अंधारात जाते. शेतीचे उत्पादन घटले की अन्नधान्य महागते, मजुरांना काम मिळत नाही आणि पशुपालकांनाही संकटाचा सामना करावा लागतो.

आणि घनराजा, आमच्या गोव्याची हिरवाई? पाण्याअभावी झाडे कोमेजत आहेत, रानफुले सुकत आहेत आणि पक्षी-वन्यप्राणी पाण्यासाठी भटकत आहेत. जंगलातील ओलावा कमी झाल्याने आगीचा धोकाही वाढतो. जैवविविधतेवर त्याचे दुष्परिणाम होतात. माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाला दिलेल्या जखमांचे दुःख आज संपूर्ण सृष्टी भोगत आहे.

घनराजा, आणखी एक गोष्ट मनाला सतत टोचते. आज जमिनींचे व्यवहार मोठ्या पैशांत होत आहेत. पूर्वजांनी जपलेली शेती, बागायती, डोंगर आणि मोकळ्या जमिनी विकून मिळालेल्या पैशांत काही जण सुखी आयुष्याची स्वप्ने पाहत आहेत. पण या पैशातून पाणी निर्माण करता येईल का? विकलेली सुपीक जमीन, तोडलेली झाडे आणि आटलेले जलस्रोत पुन्हा विकत घेता येतील का?

विकासाला माझा विरोध नाही, घनराजा. पण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश करणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेणे नव्हे का? डोंगरावरील झाडे तोडून, पाणवठे बुजवून आणि जमिनी काँक्रीटने झाकून आपण पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यापासून रोखत आहोत. पाऊस पडतो, पाणी वाहून जाते आणि पुन्हा आपणच पाण्यासाठी वणवण करतो.

पाण्याची कमतरता अशीच वाढत राहिली, तर भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येईल. ज्यांच्याकडे पैसा आहे ते पाणी विकत घेतील; पण गरीब कुटुंबांचे, शेतमजुरांचे, लहान मुलांचे आणि वृद्धांचे काय? पाण्यासारख्या मूलभूत गरजेवरही आर्थिक विषमता निर्माण झाली, तर समाजातील दरी अधिक खोल होईल.

आज आपण पाणी जपले नाही, तर पुढच्या पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. मुलांना हिरवीगार शेते, खळखळणारे ओढे आणि भरलेल्या विहिरी केवळ चित्रांतून दाखवण्याची वेळ आली, तर? आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांचे भविष्य तहानलेले झाले, तर आपण स्वतःला माफ करू शकू का?

म्हणूनच, घनराजा, केवळ तुझी वाट पाहून चालणार नाही. पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाचे पाणी साठवणे, विहिरी-तलावांचे संवर्धन, वृक्षारोपण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. पाणी ही अमर्याद संपत्ती नसून पुढच्या पिढ्यांसाठी जपण्याची जबाबदारी आहे, याची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी.

घनराजा, तुझ्या प्रत्येक थेंबाची आम्हाला किंमत कळू दे. तू भरभरून बरसावास, पण तुझ्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची शहाणपणाची वृत्तीही आम्हाला दे. पाऊस पडणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याचे पाणी जमिनीत मुरणे आणि योग्य पद्धतीने साठवणेही महत्त्वाचे आहे.

तू रुसू नकोस, बरसत राहा. धरती हिरवीगार कर, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलव. पण तुझी वाट पाहताना आम्हीही आमच्या चुका सुधारू दे. निसर्गाशी वैर नव्हे, तर मैत्री करायला आम्हाला शिकू दे. कारण पाणी वाचवणे म्हणजे केवळ एक नैसर्गिक साधन वाचवणे नव्हे, तर माणसाचे अस्तित्व, शेतकऱ्याचे भविष्य आणि संपूर्ण सृष्टीचे जीवन वाचवणे होय!


- तेजल तुलसीदास नाईक

मांद्रे गोवा, 9373591020