लक्ष-लक्ष दीप उजळती

दारात लागलेली प्रत्येक वात आपली वाट पाहत असते... आपल्याशी हितगुज करण्याचा प्रयत्न करीत असते. त्या तेवणाऱ्या वातींत प्रेमभावना दडलेल्या असतात.

Story: ललित |
30th October, 09:20 pm
लक्ष-लक्ष  दीप उजळती

तेवत राहो पणत्या वाती

सण सुखाचा, सण प्रकाशाचा

पाऊस पडो आनंदाचा

रंगीबेरंगी रांगोळी दारोदारी

लक्ष्मी नांदो दारोदारी 

दिव्यांचा लखलखाट, दारात काढलेली रांगोळी, सुंदर सजलेले घर... मिठाई, फराळ, भेटवस्तू, नवीन वस्त्रे, प्रकाशमय वातावरण... हे दृश्य अगदी मोहात पाडणारे!

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव, जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो... जो अंधारातून प्रकाशाकडे, वाईट गोष्टींचा नाश करून विजयाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते.

घरात धन, समृद्धी, सुख-समाधान लाभावे म्हणून धनत्रयोदशी साजरी केली जाते. बळीराजाचे स्मरण करून पाडवा साजरा केला जातो. बहीण भावाला ओवाळून भाऊबीज साजरी केली जाते...

नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने जनतेचे रक्षण केले. १४ वर्षे वनवास भोगून श्रीराम, सीता व लक्ष्मण अयोध्येत परतले. त्या दिवशी दिवे, पणत्या लावून त्यांचे स्वागत केले गेले. तो दिवस कायम स्मरणात राहावा म्हणून दिवाळी साजरी केली जाते. सगळीकडे आनंदी आनंद दरवळताना पाहायला मिळतो...

या सगळ्यामधून मला भावणारी गोष्ट म्हणजे दारात तेवणारी पणती... ती छोटीशी पणतीतील वात आपल्याला खूप काही सांगून जाते... स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश द्यावा, कसलीही अपेक्षा न बाळगता... वात हळूहळू विझत जाते.

माणसाच्या जीवनात सुखही कायम नसते. कधीतरी दुःखही येतेच. म्हणून माणसाने सुखात गर्व न केलेलाच बरा... चांगले कर्म करणे महत्त्वाचे. पूजा, अर्चा, भक्ती कर्मापुढे कमी पडते. भक्ती तर रावणानेही महादेवाची केली होती, पण कर्मापुढे भक्ती कमीच पडली...

एवढीशी वात, पण अंधारात तिचाच आधार वाटतो. कधी कोणाची गरज भासेल, सांगता येत नाही...

दारात लागलेली प्रत्येक वात आपली वाट पाहत असते... आपल्याशी हितगुज करण्याचा प्रयत्न करीत असते. त्या तेवणाऱ्या वातींत प्रेमभावना दडलेल्या असतात. याच पणत्यांनी सजवून आपण आपली दिवाळी सुंदर, सुखमय बनवू. आपल्या आयुष्यात हा लखलखाट कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.

अशी ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची जावो. येणारी प्रत्येक पहाट आपल्याला समाधान देऊन जावो.


- शितल संतोष सराफ

मुळगाव