आपण हल्ली मानसिक आरोग्याबद्दल पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झालो आहोत. सोशल मीडियावरून, पुस्तकांतून, पॉडकास्टमधून आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला Attachment Styles, Childhood Trauma म्हणजे काय हे समजतं, Overthinking का होतं हे कळतं आणि आपल्या वर्तनामागे कोणते Psychological Patterns असू शकतात, याचाही अंदाज असतो.
एवढंच काय, आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या वर्तनाचंही मानसशास्त्रीय विश्लेषण सहज करू शकतो! पण गंमत अशी की, जेव्हा स्वतःसाठी थेरपी घेण्याची वेळ येते, तेव्हा याच ज्ञानाने समृद्ध असलेल्या काही व्यक्तींना थेरपी कंटाळवाणी वाटू लागते.
“थेरपिस्ट मला असं काय सांगणार आहे, जे मला माहीत नाही?”
जसं की, एखाद्या व्यक्तीला माहीत असू शकतं की तिला सतत इतरांकडून मान्यता मिळवण्याची गरज का भासते. तिला स्वतःच्या नात्यांमधील तिचे ठरावीक पॅटर्न यांचाही अंदाज असू शकतो. पण हीच व्यक्ती पुन्हा अस्वस्थ देखील होते.. मनात शंका निर्माण होतात..दुर्लक्षित केलं जाईल किंवा आपल्याला सोडून दिलं जाईल, अशी भीती ही डोकं वर काढते. कारण एखाद्या भावनेमागचं कारण समजणं आणि ती भावना अनुभवताना स्वतःला सावरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत! मानसशास्त्राचं ज्ञान आपल्याला स्वतःच्या वर्तनाची कारणं समजून घेण्यास मदत करू शकतं. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत वेगळा प्रतिसाद देण्यासाठी सराव, अनुभव आणि सातत्याची गरज लागू शकते. थेरपीचा प्रवास अनेकदा याच अंतरावर सुरू होतो. काही व्यक्ती आपल्या भावनांचं इतकं सुंदर विश्लेषण करतात की त्यांचं बोलणं ऐकताना त्यांना स्वतःबद्दल खूप स्पष्टता असल्याचं जाणवतं. पण या सगळ्याचं विश्लेषण करताना ती व्यक्ती स्वतःच्या भावनांना प्रत्यक्ष जागा देते आहे का हा मात्र एक वेगळाच प्रश्न असतो!
आता याचा अर्थ प्रत्येक वेळी विश्लेषण करणं चुकीचं आहे, असा नाही. मात्र, काही वेळा विश्लेषण हे अनुभवाला सामोरं जाण्याचा मार्ग बनण्याऐवजी त्यापासून दूर राहण्याचं साधन ठरू शकतं.
“हे मला माहीत आहे” या वाक्यामागे नेमकं काय असतं?
हे वाक्य चुकीचं नाही. थेरपी घेणाऱ्या व्यक्तीला त्या संकल्पनेची आधीपासून माहिती असू शकते. पण कधीकधी या वाक्यामागे आणखी एक प्रश्न दडलेला असतो, सगळं कळत असूनही माझ्या आयुष्यात अजूनही हीच अडचण का आहे?
उदाहरणार्थ, सीमारेषा आखण्याचं महत्त्व एखाद्याला माहीत असतं. तरीही जवळच्या व्यक्तीला नाराज करण्याच्या भीतीने तो प्रत्येक वेळी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो. अशा वेळी त्याला सीमारेषांवर आणखी एक व्याख्यान देण्यापेक्षा, त्या आखताना त्याला नेमकं काय वाटतं, कोणती भीती त्याला अडवते आणि त्या भीतीसोबत राहून तो कोणता छोटा बदल करू शकतो, हे समजून घेणं अधिक उपयुक्त ठरू शकतं. कसं असतं ना, स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बदलाची प्रक्रिया नेहमी एकाच गतीने पुढे जात नाहीत. आणि हा प्रवास पुस्तकातल्या एखाद्या प्रकरणाइतका रंजक असेलच असं नाही. कधी तो पुनरावृत्तीचा असतो, कधी संथ असतो, तर कधी अपेक्षेपेक्षा अधिक कठीण असतो.
मग थेरपी कंटाळवाणी वाटणं चुकीचं आहे का?
अजिबात नाही. थेरपीमध्ये कंटाळा येणं, एखादी चर्चा निरुपयोगी वाटणं किंवा अपेक्षित बदल जाणवू नये म्हणून निराश होणं, हे अनुभव घडू शकतात. कधी सत्रांमध्ये खरोखरच पुनरावृत्ती होत असू शकते. थेरपीची उद्दिष्टं स्पष्ट नसू शकतात. थेरपिस्ट आणि क्लायंट यांच्यात योग्य ताळमेळ नसेल किंवा वापरली जाणारी पद्धत त्या व्यक्तीच्या गरजांशी जुळत नसेल. अशा वेळी थेरपीबद्दल प्रश्न विचारणं, अपेक्षा स्पष्ट करणं आणि प्रगतीचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. थेरपी म्हणजे थेरपिस्ट जे सांगेल ते निमूटपणे स्वीकारणं नव्हे. ती एक सहकार्याची प्रक्रिया आहे, ज्यात क्लायंटच्या अनुभवाला, मताला आणि निवडीला महत्त्व असतं. त्यामुळे थेरपी निरुपयोगी वाटते आहे, तर त्याकडे केवळ स्वतःच्या प्रतिकाराचा पुरावा म्हणून पाहण्याऐवजी त्यामागची कारणं समजून घेणं अधिक योग्य ठरेल. आपण स्वतःबद्दल बरंच काही वाचू शकतो. आपल्या वर्तनामागची कारणं शोधू शकतो. आपल्या भावनांना नावं देऊ शकतो. स्वतःच्या चुका आणि मर्यादाही ओळखू शकतो.
पण काय आहे ना, ती “कळतं पण वळत नाही” ह्या पठडीतील गोष्ट आहे! केवळ समजून घेतल्याने परिस्थिती बदलत नाहीत. त्या वेगळ्या पद्धतीने अनुभवाव्या लागतात, त्यांच्याशी संबंधित सवयी बदलण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि कधी कधी मदत स्वीकारण्याची तयारीही ठेवावी लागते. आणि म्हणूनच एक प्रश्न स्वतःला विचारता येईल,
“मला माझ्या मनाबद्दल खूप काही माहीत आहे, पण त्या ज्ञानामुळे माझ्या जगण्यात नेमका कोणता बदल झाला आहे?”



