अनाथालय

आई-वडिलांचं प्रेम, मायेचा आधार आणि हक्काचं घर नसणं म्हणजे काय, याची जाणीव अनाथ मुलांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर होते. त्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारा अंतर्मुख करणारा लेख.

Story: सहज सुचलेलं |
30th October, 09:55 pm
अनाथालय

‘अ​नाथालय’ किती सरळ आणि सोप्पा असा शब्द आहे नाही, ना मात्रा, ना रफार. एकदम गुळगुळीत. पण त्याचा अर्थ किती दाहक आहे! अहो, जरा चालताना ठेच जरी लागली तरी, "आई गं!" म्हणून ओरडणारे, कोणत्याही गरजेला प्रथम बाबांची आठवण काढणारे आम्ही, अनाथ म्हणजे काय हे कुठे माहीत आहे आपल्याला?

एक मध्यम वय ओलांडलेली पिढी आपली. कालओघात अनेकांचे मातापिता आता नसतीलच. पण कसे वाटते हो, आपले आई-वडील गेल्यावर? पार संभ्रमित होऊन जातो आपण. एखाद्या दिशाहीन अशा रणरणत्या, निर्मनुष्य वाळवंटात असल्याचा फील येतो. जिथे कसलाच निवारा नसतो. अहो, आयुष्याची कमीत कमी चाळीसएक वर्षे तरी आई-वडिलांचा सहवास अनुभवलेले आम्ही आणि आमची ही अवस्था, तर अगदी लहान वयातच पोरके झालेल्यांचे काय? किंवा ज्यांना आपले आई-वडील कोण हेच माहीत नाही त्यांचे काय?

आमच्या परिचयाचे एक शिक्षक होते. मुंबईत एका नामवंत शाळेत पी. टी. टीचर. कडक स्वभाव तसेच फावल्या वेळात पत्रकारिताही करीत. अनाथ ह्या शब्दाची खरी ओळख त्यांनी मला करून दिली. अतिशय रुबाबदार आणि विद्यार्थीप्रेमी असा हा शिक्षक स्वतः अनाथ होता. आपल्या पालकांविषयी काहीच माहिती नव्हती तसेच ते अनाथालयात कसे आले ह्याचीही कल्पना नव्हती. पण त्यांची हुशारी आणि शिक्षणाविषयीचे त्यांचे प्रेम पाहून अनाथालयात काम करणाऱ्या एका सेवकाने त्यांना आपले मानले, आपले नाव दिले. इतके वर्ष नावाने ओळखणाऱ्याला आडनावही मिळाले. ते नेहमी म्हणायचे की, अनाथालयात असलेले प्रत्येक मूल जेव्हा त्याला समजायला लागते ना, त्यावेळी ते आडनावाच्या शोधात असते. कोणीतरी आपल्याला स्वीकारावं, आपलं म्हणावं, असं त्यालाही वाटत असते. काहींची ती इच्छा पूर्ण होते, तर काही तसेच राहतात.

कोणीतरी आपल्यावर हक्क गाजवतोय, आपल्यावर प्रेम करतोय, चिडतो यात किती सुख असते नाही? पण प्रत्येकाच्या वाट्याला कुठे हे सुख येतं? ज्यांना गरज असते त्यांना ते मिळत नाही आणि आपल्यासारखे जे नशीबवान असतात त्यातील बऱ्याच जणांना त्याची किंमत राहत नाही. असो!

गोव्यातील एक किस्सा सांगते. सत्य घटना आहे. अशीच एका केक शॉपमध्ये अठरा ते एकोणीस वर्षांची एक सुंदरशी मुलगी भेटली. ओळख झाली. घराजवळ दुकान असल्याने बऱ्याचदा जाणे होत असे. अगदी अघळपघळ स्वभाव त्या मुलीचा. बोलता बोलता तिने एक दिवस स्वतःविषयी सांगितले. ती मुलगी आईबाप असूनही अनाथ होती आणि तिला ते अनाथ असण्यातच सुख वाटत होते. तिच्या आई-वडिलांच्या तरुणपणातल्या लग्नाआधीच्या प्रेमाची निशाणी होती ती मुलगी. जननिंदेला घाबरून तिच्या आईने तिला अनाथालयात ठेवले. कालांतराने आई-वडिलांनी लग्नही केले, पण मुलीला घरी आणलेच नाही. अनेक वर्षे गेली. एक दिवस आई न राहवून त्या मुलीला भेटायला गेली. बरोबर तिचे वडीलही होते. तिला घरी चलण्याविषयी गळ घातली. आश्रमाचे चालकही तयार झाले, पण मुलगी तयार होईना. तिने सरळ सांगितले की, लहानपणापासून ज्या घराने मला वाढविले तेच माझे घर आणि तेच माझे पालक. ती घरी परत गेली नाही. आज तिचे लग्न झाले आहे, सुखात आहे. पण ही सत्य घटना वाचल्यावर वेगळेच वाटले नाही? अनाथपण हे असेही असू शकते. आपले आई-बाप कोण आहेत हे माहीत असूनही स्वेच्छेने एकटेपणा स्वीकारणे म्हणजे काय खाऊ आहे?

तान्ह्या अर्भकापासून ते ज्यांना धड बोलताही येत नाही या वयाची असंख्य मुले अनाथाश्रमात येतात. काही वेळा पालक स्वतःच आणून सोडतात. कारणे अनेक. पण पोटच्या पोराला ढकलतात मात्र या गर्तेत. अशा अनेक स्वयंसेवी संघटना आहेत, त्या अशा मुलांचा स्वीकार करतात. अर्थात त्यात मिशनरी जास्त आहेत हे मानायला हवे. अशा संस्था त्यांना आधार देतात, शिक्षण देतात. सरकारी नियमांचे पालन करून चांगल्या कुटुंबात दत्तकही देतात. त्या मुलांनाही घर मिळते. मी अशी कितीतरी मुले दत्तक गेल्यानंतर चांगली शिकून मोठ्या पदावर पोहोचलेली पाहिली आहेत. नामवंत क्रिकेटर स्टीव वॉ, सचिन तेंडुलकर तसेच काही उद्योगपती, अनेक कार्यकर्ते ह्या संघटनांना आर्थिक पाठबळही देत आहेत. बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. पण खंत एकच की, अनाथाश्रमात मुले येण्याचे प्रमाण काही थांबत नाही. सरकारी अनास्था तर आहेच, पण ते नेहमीच असते. पण समाजाचा घटक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे की नाही?...


- सौ. रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.