आईची मॅरेथॉन

आईची मॅरेथॉन कधीच पदकासाठी नसते. ती आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि आनंदासाठी असते. म्हणून पुढच्या वेळी आईने दिलेला डबा हातात घेताना केवळ अन्न पाहू नका, तर त्यात भरलेली तिची माया अनुभवा. कारण आई आयुष्यभर आपल्यासाठी धावत असते; आता तिच्या आनंदासाठी तिच्यासोबत धावण्याची वेळ आपली आहे!

Story: ललित |
23rd October, 09:26 pm
आईची मॅरेथॉन

आज मी डबा न खाताच घरी घेऊन आले आणि आईच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. तिने मला एकच वाक्य विचारलं...“सकाळची माझी होणारी मॅरेथॉन तू पाहतेस ना? मग हा डबा घरी परत आणायला तुझ्या मनाला काहीच वाटलं नाही?” तिच्या या एका वाक्याने मी क्षणभर स्तब्ध झाले. तिच्या डोळ्यांत राग होता, आवाजात चिडचिड होती, पण त्या रागामागे दडलेली तिची काळजी मला त्या क्षणी कळलीच नाही.

आईची सकाळ म्हणजे एखाद्या मॅरेथॉनची सुरुवातच! पहाटेपासून नाश्ता, डबा, घरातील कामं, सगळ्यांना वेळेवर उठवणं आणि प्रत्येकाची तयारी करून देणं, या सगळ्यांत तिची धावपळ सुरू असते. एका हाताने पोळ्या लाटताना दुसऱ्या हाताने डबा भरणारी आई घड्याळाच्या काट्यांशी जणू स्पर्धाच करत असते. मात्र, तिच्या या कष्टांची आपल्याला सवय झालेली असते. ती आई आहे, तिने हे सगळं करायचंच, असं आपण नकळत गृहीत धरतो.

सगळ्यांचे डबे भरताना तिला स्वतःच्या जेवणाची आठवण राहते का? सगळ्यांना वेळेवर पाठवताना तिला स्वतःचा थकवा जाणवतो का? घरातून निघताना ती प्रेमाने सांगते, “वेळेवर खा हं! उपाशी राहू नकोस. डबा पूर्ण संपव.” हे शब्द आपल्याला रोजचे वाटतात; पण त्या डब्यात केवळ अन्न नसतं, तर तिची माया, काळजी आणि निःस्वार्थ प्रेम भरलेलं असतं.

आपण कधी मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्यात, कधी बाहेरचं खाण्यात, तर कधी इतर कामांत डबा खाणं विसरतो. संध्याकाळी तोच डबा घरी परत आणताना आपल्याला काही वाटत नाही. मात्र, तो पाहून आईच्या मनात प्रश्नांची गर्दी होते. मुलाने काही खाल्लं असेल का? तो उपाशी राहिला नसेल ना? तिचा राग हा केवळ अन्न वाया गेल्याचा नसतो; त्यामागे मुलाच्या आरोग्याची आणि भविष्याची चिंता असते.

आईची मॅरेथॉन फक्त सकाळच्या चार-पाच तासांची धावपळ नसते. ती तिच्या संपूर्ण आयुष्याची शर्यत असते. मुलांना चालायला शिकवण्यापासून त्यांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि भविष्याच्या स्वप्नांसाठी ती सतत धावत असते. मुलं मोठी होतात, स्वतःच्या पायांवर उभी राहतात; पण आईची काळजी मात्र संपत नाही. तिच्या प्रत्येक प्रश्नामागे एकच भावना असते—माझ्या मुलाला काही होऊ नये!

या सगळ्यात आपण विसरतो की आईसुद्धा माणूस आहे. तिलाही थकवा येतो, विश्रांती हवी असते आणि कुणीतरी प्रेमाने विचारावं असं वाटतं, “आई, तू ठीक आहेस ना?” तिच्या हातातील काम स्वतःहून घेणं, तिच्या कष्टांची जाणीव ठेवणं आणि तिने दिलेला डबा प्रेमाने संपवणं, या छोट्या गोष्टी तिच्यासाठी मोठं समाधान ठरू शकतात.

आईच्या प्रेमाची परतफेड महागड्या भेटवस्तूंनी होत नाही. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा ओळखून तिला थोडा आराम देणं, तिचं बोलणं शांतपणे ऐकणं आणि तिच्या आरोग्याची काळजी घेणं, यातच प्रेमाचा खरा अर्थ दडलेला आहे. आयुष्यभर ती आपल्याला जिंकवण्यासाठी धावत असते. आपलं सुख हेच तिचं पदक आणि आपलं यश हीच तिची ट्रॉफी असते.

त्या दिवशी आईच्या एका प्रश्नाने मला माझी चूक जाणवून दिली. मी ठरवलं, यापुढे तिच्या कष्टांकडे दुर्लक्ष करायचं नाही. कारण आज ती माझ्यासाठी धावत आहे; उद्या तिची पावलं थकतील, तेव्हा तिला माझ्या आधाराची गरज असेल. तिने माझ्यासाठी दिलेला वेळ मी परत करू शकणार नाही; पण तिच्या सहवासासाठी वेळ नक्कीच देऊ शकते.

आई, तू आयुष्यभर आमच्यासाठी धावलीस. आता तुझ्या आनंदासाठी धावण्याची वेळ आमची आहे. आईची मॅरेथॉन कधीच पदकासाठी नसते; ती असते आपल्या मुलांच्या सुखासाठी. म्हणून पुढच्या वेळी आईने दिलेला डबा हातात घेताना केवळ अन्न पाहू नका, तर त्यात भरलेली तिची माया अनुभवा. कारण एक दिवस डबा भरून देणारे तिचे हात थकतील; पण त्या हातांनी दिलेल्या प्रेमाची ऊब आयुष्यभर आपल्या सोबत राहील.


- तेजल तुलसीदास नाईक

मांद्रे गोवा, 9373591020