मौनाची भाषांतरे

माणसाच्या मनातील प्रत्येक भावना शब्दांत व्यक्त होत नाही. कधी मौन, विराम आणि नजरेतील भावही मनाचा अनोळखी प्रवास उलगडतात. समजून घेण्यासाठी संवेदनशीलतेची गरज असते.

Story: मनी मानसी |
23rd October, 09:09 pm
मौनाची भाषांतरे

मानसोपचारतज्ज्ञ म्हणून माणसांना ऐकताना एक गोष्ट वारंवार जाणवते, माणूस जे बोलतो, तेवढाच तो नसतो. त्याच्या शब्दांपलीकडेही एक जग असतं. काही भावना तिथे असतात, ज्यांना अजून नाव मिळालेलं नसतं. काही आठवणी असतात, ज्यांच्यापर्यंत पोहोचण्याची मनाची तयारी झालेली नसते आणि काही प्रश्न असे असतात, जे स्वतःलाही विचारण्याचं धाडस माणूस करू शकत नाही.

त्यात समुपदेशनाच्या खोलीत शब्दांना महत्त्व असतंच परंतु ह्या शब्दांमधल्या विरामांनाही स्वतःची एक भाषा असते. एखादं वाक्य पूर्ण करण्याआधी घेतलेला दीर्घ श्वास, टाकलेला उसासा, एखाद्या विषयावर बोलताना अचानक बदललेला सूर किंवा सहज हसून टाळलेली एखादी गोष्ट या सगळ्यांकडे एक मनोविश्लेषक म्हणून माझं लक्ष जातं. अर्थात, प्रत्येक हावभावामागे एखादा खोल मानसिक संघर्ष असतोच असं देखील नाही. पण कधी कधी अशा क्षणांतून व्यक्तीच्या अनुभवाकडे नव्याने पाहण्याची संधी मात्र हमखास मिळते. 

मला वाटतं, मानसोपचारातील सर्वांत नाजूक भाग हाच असावा..समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची इच्छा आणि तिच्याबद्दल निष्कर्ष काढण्याची घाई, यांमधली सीमारेषा ओळखणं. मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर आपल्या मनातलं सगळंच आपल्याला स्पष्टपणे माहीत असतं असं नाही. काही इच्छा, भीती, अपराधीपणाच्या भावना आणि वेदनादायक अनुभव जाणीवेच्या बाहेर राहू शकतात. त्यांच्याशी सामना करणं कठीण झालं, की मन कधी विनोदाचा आधार घेतं, कधी विषय बदलतं, तर कधी एखाद्या वेदनादायक घटनेबद्दल अगदी निर्विकारपणे बोलतं.

समजा, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील मोठ्या दुःखाविषयी शांतपणे बोलते.. पण एखाद्या क्षुल्लक वाटणाऱ्या प्रसंगाचा उल्लेख करताना मात्र तिचा कंठ दाटून येतो. अशा वेळी मला त्या छोट्या प्रसंगाचा अर्थ लगेच लावण्यापेक्षा, त्यात तिच्यासाठी काय दडलं आहे, हे समजून घ्यावंसं वाटतं. कदाचित त्या प्रसंगाने एखादी जुनी आठवण जागी केली असेल. कदाचित त्या भावनेला शब्द मिळाले नसतील. आणि कदाचित त्या क्षणी तिला स्वतःलाही नेमकं काय जाणवतंय, हे समजत नसेल. अशा वेळी प्रश्न विचारण्यापेक्षा थोडं थांबणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं.

मनोविश्लेषणात व्यक्तीच्या पूर्वीच्या नात्यांतील भावना आणि अपेक्षा थेरपिस्टसोबतच्या नात्यातही उमटू शकतात. याला स्थानांतरण (transference) म्हणतात. कधी थेरपिस्ट काय विचार करेल याची भीती, कधी आपलं म्हणणं समजून घेतलं जाणार नाही अशी शंका, तर कधी स्वीकारलं जाण्याची अपेक्षा या अनुभवांकडेही संवेदनशीलतेने पाहता येतं. मात्र, त्यांचा अर्थ ठरवून टाकण्याऐवजी क्लायंटच्या अनुभवातून तो उलगडू देणं महत्त्वाचं असतं.

या प्रक्रियेत मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते, समोरच्या व्यक्तीला समजून घेणं म्हणजे तिच्याबद्दल सगळं माहीत असणं नव्हे. उलट, अजून काय माहीत नाही, याची जाणीव असणंही तितकंच आवश्यक आहे.

आणि ह्याचसाठी समुपदेशनादरम्यान बोलता बोलता येणारे ते क्षणिक मौन ज्यास आपण awkward pause or silence म्हणतो ते मला मात्र अजिबात awkward किंवा असहज वाटत नाही. आणि एक समुपदेशक म्हणून मी ती रिकामी जागा भरून काढायचा ही प्रयत्न करत नाही! कारण ती शांतता नेहमीच अस्वस्थतेची खूण नसते.  उलट, कधी व्यक्ती विचार करत असते, कधी एखाद्या भावनेला शब्द शोधत असते, तर कधी तिला काहीच बोलायचं नसतं. प्रत्येक शांततेचा अर्थ शोधण्याचा अट्टहास केला, तर त्या व्यक्तीला स्वतःच्या गतीने आयुष्य अनुभवण्याची जागाच उरणार नाही.

खरं तर, ही जाणीव थेरपीच्या खोलीपुरती मर्यादित नाही. आपण रोजच्या आयुष्यातही समोरच्या माणसाच्या शांततेचा अर्थ स्वतःच्या सोयीने लावतो. उत्तर मिळालं नाही, की नकार समजतो. अश्रू दिसले नाहीत, की दुःख नाही असं मानतो. एखादी व्यक्ती हसली, की ती आनंदी आहे असं गृहीत धरतो. पण माणसाचं मन इतकं सरळसोट नसतं हो! 

आज मला असं वाटतं की, एखाद्याला समजून घेण्याची सुरुवात त्याच्याबद्दल योग्य उत्तर मिळवण्यात नसते तर त्याला स्वतःचं उत्तर शोधण्यासाठी पुरेसा अवकाश देण्यात असते. कारण प्रत्येक शांतता उलगडून दाखवायची नसते. काही शांततांसोबत थोडा वेळ बसायचं असतं. कदाचित त्या अवकाशातच एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा स्वतःचा आवाज ऐकू येऊ लागतो.