पणजी : गोव्याच्या राजकीय पटलावर आगामी समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षांतर्गत फेरबदल आणि पक्षाची कास सोडून गेलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या संभाव्य पुनरागमनाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भाजप पक्षात पूर्वी महत्त्वाची पदे भूषवलेले आणि संघटन उभारणीत मोलाचे योगदान दिलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रिकर यांच्या पक्षात परतण्याच्या शक्यतेवर राजकीय वर्तुळात विविध प्रवाह समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बाबुश मोन्सेरात आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी प्रतिक्रिया दिल्या.
उत्पल पर्रिकर यांच्या पक्षात पुनरागमनाच्या शक्यतेवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपचे पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी अत्यंत सूचक मत व्यक्त केले आहे. उत्पल पर्रिकर यांनी पक्षात परतणे हा एक स्वागतार्ह निर्णय ठरेल, असे सांगताना उशीर झाला तरी चालेल पण योग्य वेळी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनीच गोव्यात हा पक्ष तळागाळापर्यंत उभा केला आहे, त्यामुळे त्यांच्या मुलाने पक्षात परतणे ही अत्यंत स्वाभाविक आणि योग्य गोष्ट असल्याचे बाबुश यांनी स्पष्ट केले. उत्पल पर्रिकर पक्षात परत आल्यास त्यांचे स्वागत करण्यास आपली कोणतीही हरकत नाही, असे सांगतानाच पक्षाच्या केंद्रीय किंवा राज्य नेतृत्वाच्या निर्णयामध्ये आपण कसलाही अडथळा आणणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. पक्षाकडून जो काही निर्णय घेतला जाईल, तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, पणजी विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटाबाबत विचारले असता, यावर पक्षश्रेष्ठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे बाबुश म्हणाले. निवडणुकीच्या वेळी किंवा योग्य प्रसंगी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली जाईल, असे स्पष्ट करत त्यांनी भूतकाळात काही मतभेदांमुळे पक्ष सोडलेल्या सर्वच नेत्यांना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले. ज्या नेत्यांनी पक्षाच्या उभारणीत कष्टाचे योगदान दिले आहे, त्यांनी पुन्हा पक्षात परत यावे आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. कोणाच्याही येण्या-जाण्याने पक्षाच्या मूळ बांधणीवर परिणाम होऊ नये, कारण हा पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाने उभा राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या बाजूला, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी देखील पूर्व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रिकर यांच्यासह जुन्या ज्येष्ठ नेत्यांच्या पुनरागमनाबाबत अतिशय सकारात्मक संकेत दिले आहेत. पक्षाची मूळ विचारधारा आणि राष्ट्रवादाचा विचार समोर ठेवून ज्या नेत्यांनी भूतकाळात पक्षाच्या प्रसारासाठी अतोनात परिश्रम घेतले आहेत, त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करणे हे पक्षाच्या हिताचेच ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गोव्यामध्ये भाजपचा पाया भक्कम करण्यात आणि तो सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात ज्येष्ठ नेत्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यामुळे जुने मतभेद बाजूला सारून सर्व समविचारी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा एकाच विचारधारेखाली एकत्र यावे, असा सूर त्यांनी आळवला.
ज्यांनी काही कारणास्तव किंवा परिस्थितीमुळे पक्ष सोडला होता, त्यांच्या भूतकाळातील योगदानाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी योग्य तो सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला. पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा अनुभव पाठीशी ठेवण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे मत त्यांनी मांडले.
भारतीय जनता पक्षाबरोबर माझे बऱ्याच वर्षांचे नाते आहे. २०२२मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असली तरी अन्य कोणत्याही पक्षात मी प्रवेश केलेला नाही. माझा पुढील निर्णय दोन दिवसांत कळेल : लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री


