आरोग्य म्हणजे नेमकं काय?

आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवनाचा अर्थ.

Story: आरोग्यसंवाद |
23rd October, 09:18 pm
आरोग्य म्हणजे  नेमकं काय?

"तुमची तब्येत कशी आहे?"

हा प्रश्न आपण सहज विचारतो. आणि उत्तरही तितकंच सहज मिळतं. "एकदम ठीक!"

पण "ठीक" म्हणजे नेमकं काय?

ताप नाही... साखर नियंत्रणात आहे... बी.पी. ठीक आहे... रक्ततपासणीचे अहवाल नॉर्मल आहेत... म्हणजे आपण निरोगी आहोत?

हा प्रश्न जरा थांबून विचारण्यासारखा आहे.

एक प्रसंग सांगते. एका गृहस्थांनी अभिमानाने त्यांचे सर्व तपासणी अहवाल माझ्यासमोर ठेवले. "डॉक्टर, सगळं नॉर्मल आहे."

मी हसले आणि विचारलं, "छान! मग भूक कशी लागते?"

ते थोडे थांबले. "भूक तर फारशी लागत नाही."

"झोप?"

"गोळी घेतली तर लागते."

"पोट साफ?"

"तेही रोज होत नाही."

अहवाल नॉर्मल होते... पण शरीर काही वेगळीच गोष्ट सांगत होतं.

आज आपल्या आरोग्याची व्याख्या अनेकदा रिपोर्टच्या चौकटीत अडकून बसली आहे. रिपोर्ट महत्त्वाचे नाहीत असं अजिबात नाही. ते अत्यंत आवश्यक आहेत. पण ते आरोग्याचं संपूर्ण चित्र दाखवतातच असं नाही.

घराच्या भिंती रंगवून सुंदर दिसू शकतात. पण पाया कमकुवत असेल, तर त्या सौंदर्याला किती अर्थ उरतो?

शरीराचंही तसंच आहे.

कधी कधी शरीर अगदी शांतपणे सांगत असतं,

"मी थकलो आहे."

"मला भूक लागत नाही."

"माझी झोप हरवली आहे."

"मला उत्साह वाटत नाही."

आणि आपण म्हणतो,

"वय झालं."

"कामाचा ताण आहे."

"सगळ्यांचंच असं असतं."

कदाचित असं असेलही. पण प्रत्येक वेळी?

आयुर्वेद आरोग्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतो. त्याच्यासाठी आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणं नाही.

आरोग्य म्हणजे सकाळी डोळे उघडल्यावर दिवसाची ओढ वाटणं. भूक लागल्यावर अन्नाचा आनंद घेता येणं. जेवल्यावर ओझं नाही, तर ऊर्जा जाणवणं. दिवसभर काम करूनही मन प्रसन्न राहणं. रात्री उशीला डोकं टेकलं की शांत झोप लागणं.

ही अवस्था मिळाली, तर अहवाल नॉर्मल असो वा नसो, शरीर जगण्याची साथ देत असतं. आणि ही अवस्था हरवली, तर आकडे...