ती होती जिजाई, जिने दिला बहादूर पुत्राला जन्म,
ती होती सावित्रीबाई, जिने मुलींच्या शिक्षणाचा लावला ध्यास.
ती होती आनंदीबाई, जिने स्वप्नांना दिले आकाश,
ती होती अहिल्याबाई, जिने कर्तृत्वाने घडवला आदर्श राज्यकारभार.
अशी स्त्रीची रूपे अनेक आहेत, जी शब्दांमध्ये देखील सांगून संपणार नाहीत. स्वतःच्या संसाराबरोबर जगातील अन्यायाविरुद्ध लढा देण्याची अफाट शक्ती या स्त्रीमध्ये आहे. आपल्या दोन खांद्यांवर मुलीची, पत्नीची, आईची भूमिका सांभाळताना एक स्त्री अनेक अडचणींचा सामना करते, पण जिद्द सोडत नाही. त्यामुळे अशा स्त्रीचा सन्मान समाजाने नेहमी करायला हवा.
आता नवरात्रीचा सण सुरू झालेला आहे. आता नऊ दिवस सर्व ठिकाणी देवी दुर्गेची पूजा-अर्चा होणार, धार्मिक विधी होणार. सगळीकडे नऊ दिवस उत्साह, आनंद नांदणार. मात्र हा उत्साह फक्त नऊ दिवसांपुरताच सीमित असावा का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण स्त्री ही फक्त एक सामान्य स्त्री नसून ती एक शक्ती आहे. जिच्यामुळे कुटुंबाला प्राण मिळतो आणि जगण्याला अर्थ मिळतो. स्त्रीचे उपकार मानणे शक्य नाही. ती एक चांगली मुलगी, पत्नी, व माता आहे. ती हजारो कष्ट झेलते, मात्र याची जाणीव कोणालाही होत नाही. अशा सर्वव्यापी स्त्रीचा सन्मान प्रत्येकाने करायला हवा.
स्त्री ही साक्षात महिषासुरमर्दिनीचे रूप आहे. ती स्वतःच्या कामाबरोबर इतरांची काळजी घेते, तसेच अन्यायाविरुद्ध आवाजदेखील उठवते. याचे परिपक्व उदाहरण म्हणजे दुर्गामातेने घडवलेला इतिहास. अर्थातच, जेव्हा महिषासुर नावाच्या एका बलाढ्य राक्षसाने पृथ्वीवर अत्याचारांचा व त्रासाचा धुमाकूळ घातला, तेव्हा सर्व देव संकटात होते. आणि या संकटातून मुक्त होण्याकरिता सर्व देवांनी जप करायला, देवाचे नाव घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या या शक्तीतून देवी दुर्गामातेचा जन्म झाला. तेव्हा सर्व देवांनी मातेला आपापल्या हातातील शस्त्रे अर्पण केली. आणि त्यावेळी देवी दुर्गामातेने त्या बलाढ्य महिषासुराचा वध केला आणि सर्वसृष्टीवर शांतता पसरविली याचेच ध्येय घेऊन आजची स्त्री ही अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिसते. जो इतिहास दुर्गामातेने घडवला, त्याची जाणीव कोण दररोज ठेवत नाही. त्यामुळे रोजच्या जीवनात स्त्रीचा सन्मानदेखील होत नाही. फक्त तिच्या वाट्याला अपमान,व्देष, तिरस्कार यांची सावली पढते. जर प्रत्येकाने चांगल्या वागणुकीने या इतिहासाचा विचार केला, तर प्रत्येक स्त्रीच्या नसानसांत जी इच्छाशक्ती दाटलेली आहे, त्याचा प्रत्यय प्रत्येकाला येऊ शकतो. तो येण्यासाठी प्रत्येक पुरुषाने असो वा स्त्रीने असो, यावर बारकाईने विचार करायला हवा.
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अशी देवीची अनेक नावे आहेत. प्रत्येक नाव हे देवीच्या इच्छाशक्तीचे, तिच्या मनोभावांचे प्रतिनिधित्व करते. अर्थातच, जर स्त्रीचा अंत कोणी पाहिला, तर ती कालरात्री व कात्यायनीचे रूप घेऊन लढू शकते. जर तुम्ही तिचा सन्मान केलात, जर तुमच्या आई-बहिणीप्रमाणे तिला मानलात, तर ती महागौरी बनून तुम्हाला जवळ घेऊ शकते. म्हणूनच, आज प्रत्येक मनुष्याने तिचा सन्मान केला पाहिजे. आज मुलींवर होणारे अत्याचार थांबवले पाहिजेत, नाही तर तिच्यातील कालरात्री पेटून उठायला वेळ लागणार नाही.
नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान केले जातात. हे रंग केवळ वस्त्रांपुरते किंवा केवळ सजावटीपुरते मर्यादित नसतात. तर या प्रत्येक रंगात स्त्रीचे स्वभाव लपलेले आहेत. स्त्री कधी प्रेमळ बनते, कधी खंबीर बनते, कधी प्रसंगांना बळकटपणे सामोरी जाते, तर कधी स्वतःच्या कर्तृत्वाने नवीन जग साकार करते. आजच्या काळात स्त्रिया स्वतःच्या कर्तृत्वाने मोठमोठी शिखरे गाठत आहेत. परंतु आजदेखील स्त्रियांचा अपमान करणे, त्यांच्यावर अन्याय करणे, त्यांचा छळ करणे या गोष्टी चालूच आहेत. आज मुलींना शिक्षण देणे, त्यांच्या निर्णयांना प्रोत्साहन देणे, त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यास पाठिंबा देणे, यातच खरी देवीपूजा आहे. जसे नऊ प्रकारचे रंग वेगवेगळे संदेश देतात, त्याचप्रकारे स्त्रीच्या आयुष्यात संघर्ष, जिद्द, कर्तृत्व यांचेही अनेक रंग आहेत. त्यामुळे आज प्रत्येक पुरुषाने स्वतःच्या घरातील आई-बहिणींचा तसेच आजूबाजूच्या सर्व स्त्रियांचा सन्मान करणे ही एक जबाबदारी आहे.
नवरात्रीचा सण हा फक्त नऊ दिवसांपुरता साजरा न करता तो प्रत्येक दिवशी साजरा केला, तर खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्त जग होण्यासाठी वेळ लागणार नाही. कारण स्त्री ही दैवी शक्ती आहे, त्यामुळे तिचा सन्मान सदैव करा.
त्यामुळे,
आता बंद करा अन्याय, बंद करा अत्याचार,
कारण, आता झेलायला ती नाही आहे तयार,
जर पेटून उठली तर काली बनून सामना करणार,
जर समजून घेतलात तर गौरी बनून जवळ करणार,
समजा, समजवा, अन् विचार करा,
फक्त नवरात्रीपुरताच नाही, तर प्रत्येक दिवस तिचा आदर करा.



