तृप्तीचे कुटुंब आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सहलीला गेले होते. दुपारच्या वेळेला छान निसर्गाच्या सानिध्यात जेवण झाले आणि थोडावेळ मुलांना झाडाखाली गार वाऱ्यात झोप काढा, असे सांगितले. मुले दुसऱ्या झाडाखाली आराम करायला गेली, इकडे यांच्या गप्पा चालू झाल्या. एवढ्यात मीना म्हणाली, "एकदा काय गंमत झाली की, आम्ही सर्व कामावर असताना मंदार एकटाच घरात होता. संध्याकाळी आम्ही परत आलो तेव्हा मंदार झोपी गेला होता, तो कसा उठेना! मग आम्ही अख्खा बाजार करून खाऊन-पिऊन आलो, पोरगं गार झोपलंय, ते झोपू दे!"
तर दुसरी मैत्रीण म्हणाली, "छान समजून घेतलं हो तुम्ही... माझी ननंद, आता ती थोडीशी सरबरीत वागते, याचे कारण काय माहीत आहे? शेतात झाडाखाली अभ्यास करता करता डोळा लागला व पुस्तके गुरांनी खाल्ली आणि आता वडिलांच्या भीतीने तिने आधीच आपले डोके उडवले, एवढ्या कडक शिस्तीचे होते ते!"
तृप्तीने तुषारकडे एक नजर टाकली व अबोलीच राहिली. तुषारला जे समजायचे ते समजले, मात्र तृप्तीसमोर क्षणात प्रसंग उभा झाला.
"निद्रा हि नाम जननी, सर्वभूतस्य भामिनी | सुखदा सर्व दुःखानां, शान्तिदा परमोस्थिता ||"
सर्व प्राणीमात्रांत मातासमान अशी ही झोप आहे. दुःख दूर करून सुख देणारी व परमशांत करणारी आहे. ती कमी असू नये, जास्तही असू नये, योग्य प्रमाणात असावी. तिने एक कटाक्ष दुसऱ्या झाडाखाली झोपलेल्या करुणेकडे टाकला. असे काय घडले होते?
करुणा घरी एकटी गाढ झोपली असताना, बाहेरून दार न उघडल्याने वडील चिडले आणि त्यांनी राग अनावर होऊन तिला अंगावर वळ उठेपर्यंत मारले. झोपेत असल्यामुळे तिला मारण्याचे कारणही समजले नाही. आईने लेकीला सावरत नवऱ्याला जाब विचारला, तेव्हा त्यांनाही पश्चाताप झाला व त्यांनी माफी मागितली.
मात्र, या अनावधानाने झालेल्या मारहाणीमुळे मुलीच्या मनावर कायमचे डाग पडले. असे प्रसंग आयुष्यभर सलत राहतात आणि त्यामुळे मुले पुन्हा अशी निश्चिंत व गाढ झोपू शकतील का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. म्हणूनच झोप जरी शांत असली, तरी मन नेहमी जागृत ठेवणे गरजेचे असते.
एका संस्कृत श्लोकात म्हटले आहे की, विद्यार्थ्याने कसे असावे:
"काकाचेष्टा बको ध्यानं श्वाननिद्रा तथैव च | अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंच लक्षणं ||"
विद्यार्थ्यांची पाच लक्षणे: विद्यार्थ्यांचे लक्ष कावळ्यासारखे चोख, एकाग्रता बगळ्यासारखी आणि झोप कुत्र्यासारखी (म्हणजेच किंचित आवाजानेही जाग येणारी) असावी. तसेच, अभ्यासात सुस्ती येऊ नये म्हणून कमी खाणारा आणि प्रसंगी घरापासून लांब राहून ध्येय साध्य करणारा असावा.
झोप आणि आरोग्याचे महत्त्व: जी झोप घ्याल ती शांत घ्या. आरोग्यासाठी लवकर झोपणे आणि लवकर उठणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड काळात मुले सतत घरात व अंथरुणात राहून शिकल्यामुळे आणि रविवारसारख्या सुट्ट्यांमुळे मुलांच्या दिनचर्येवर व झोपेवर खूप वाईट परिणाम झाले. म्हणूनच चांगल्या सवयी नेहमी अमलात आणाव्यात; कारण चांगली झोप ही प्रकृतीचे वरदान आहे.
झोप प्रकृतीची अशी देणगी आहे की, गरीब-श्रीमंत, राजा-रंक यांना समानच दिली आहे. चांगले कर्म आणि कर्तव्य निभावले तर लागणारी झोप ही शांतच असते.



