'आई गं...' कडून 'बाबा रे...'कडे जेव्हा प्रवास होतो, तेव्हा समजून घ्यायचे की मोठे काहीतरी घडलेले आहे. बालपणाची पायरी ओलांडून वर पोहोचल्याचे दुःख आहे की आनंद, तेच समजत नाही. बालपणाचे सुख त्या लहान लहान गोष्टींमध्ये असते. आपला पहिला शब्द, पहिले पाऊल, पहिला घास, पहिले खेळणे... आणि असे बरेच 'पहिले' आपल्या आई-बाबांना आभाळभर आनंद देऊन जातात. खेळताना धडपडून पडलो की लगेच 'आई गं...' म्हणून घरात गोंगाट पसरायचा. हे त्या निरागस मनाचे चित्र कधी बदलले, ते समजलेच नाही. पण प्रत्येक क्षणात सोबत असलेला 'बाबा' आता समजायला लागला.
"अनंत अमुची ध्येयाशक्ती, अनंत आशा उरी स्मरण...
मातीमधेही उगवूनी येऊ, उरात आहे असाच बाणा...
पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा!"
कुसुमाग्रजांच्या या ओळी म्हणजे बाबांचेच चित्र आहे, असे भासते. बालपणाची सीमा ओलांडून माणूस आयुष्याच्या अथांग प्रवासात उतरतो आणि अचानक एखादे मोठे वादळ समोर उभे राहते, पाय डगमगू लागतात; तेव्हा ओठांवर नकळत आणि सगळ्यात आधी जी हाक येते, ते नाव असते... 'बाबा'!
आपल्या लेकराच्या मनात ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ताकद अन् जिद्द बाबा देतात. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी भविष्याबद्दलच्या आशा आणि स्वप्ने बाबांची इच्छाशक्ती तेवत ठेवते. त्यांचे धैर्य आणि विश्वास हा संकटापेक्षा नेहमीच मोठा ठरतो. कितीही संकटे आली, तरी पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा सतत बाबा तुमच्यामुळे मिळते.
कितीही कठीण प्रसंग आला; पायऱ्या चढायचे सोडून उतरण्याची वेळ आली, तरी बाबांचा आधार डगमगत नाही. नेहमी प्रोत्साहित करणारे असे बाबाच असतात. लेकरांची मेहनत मातीमोल झाली, तरीही पुन्हा मातीतून ताठ मानेने उभारी घेण्याचे बळ बाबांकडून मिळते.
बाबा म्हणजे आधार आणि विश्वास. जेव्हा लेकरे कावरीबावरी होतात, त्या वेळी "काळजी करू नकोस, तू फक्त लढ!" असा विश्वासाचा हात पाठीवर असतो. तेव्हा त्या एकाच स्पर्शाने आणि शब्दाने आमच्यामध्ये संकटाशी दोन हात करण्याचे बळ मिळते. बाबा, तुझी सोबत असली की कठीणही सोपे वाटते, आयुष्यातील गुंता हळूवारपणे सुटायला लागतो.



