म्हापसा : घाटेश्वरनगर आसगाव येथे उतरणीवर ओमनी व्हॅनचे हॅण्डल लॉक झाले व गाडीने वीज खांबाला जोरदार धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या गाडीतील चार जणांपैकी दोघे लहान मुले आहेत. त्यातील एकावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये वीर तलवार (वय १५) व सफल एस. सफाल्या (वय १६) हे गंभीर जखमी झाले. तर, वाहनचालक प्रणव वेणू (वय २२) व एस. सफाल्या (सर्वजण रा. खोर्ली म्हापसा) हे किरकोळ जखमी झाले.
अपघात रविवार, १८ रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास घडला. जीए ०३ आर १३९० क्रमांकाच्या ओमनी व्हॅनमधून चौघे आसगावच्या दिशेने जात होते. घाटेश्वर मंदिर ओलांडल्यानंतर उतरणीवर अचानक गाडीचे हॅण्डल लॉक झाले. त्यामुळे चालक प्रणव वेणू याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव व्हॅन रस्त्याच्या कडेच्या वीज खांबाला धडकली.
वीज खांबाला जोरदार धडक बसल्याने व्हॅनच्या डाव्या बाजूच्या दर्शनी भागात चालकाच्या शेजारी बसलेला वीर तलवार व त्याच्या मागे बसलेला सफल हे दोघेही अल्पवयीन आतमध्ये अडकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतलेले आजूबाजूचे लोक व रस्त्यावरून ये- जा करणार्या वाहनस्वारांनी म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांना कारमधून बाहेर काढले. नंतर रुग्णवाहिकेतून जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले.
जिल्हा इस्पितळातून गंभीर जखमी झालेल्या वीर याला पुढील उपचारार्थ गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवून दिले. त्यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली आहे. हात फ्रॅक्चर झालेल्या सफल याच्यासह इतर दोघांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
हणजूण पोलीस हवालदार हरीष सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.


