पणजी : सासष्टी तालुक्यातील एका महिलेची २.६० कोटी रुपयांची ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा मुख्य हवाला ऑपरेटर मुकेश कुमार पुखराज जैन उर्फ ‘मुकेश भाई’ याला अटक केली. दरम्यान, मेरशी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयाने संशयित जैन याला तीन दिवसांची ईडीची कोठडी ठोठावली.
सासष्टी तालुक्यातील एका महिलेच्या तक्रारीवरून गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला. त्यानुसार, संशयितांनी तक्रारदाराला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून त्यांचे जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले. तसेच गोयल यांनी मुंबईतील कॅनरा बँकेत या महिलेच्या नावावर खाते उघडून त्यात ६ कोटी रुपये जमा केल्याची सांगितले. ही रक्कम मनी लाँड्रिंगशी निगडित असल्याचे सांगून संशयितांनी त्यांच्याकडून प्रकरण मिटविण्यासाठी तब्बल २ कोटी ६० लाख ३३ हजार ६३४ रुपये उकळले.
ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त करून चौकशी सुरू केली. त्यानंतर ईडीने प्रथम १७ जुलै रोजी गोव्यात दोन ठिकाणांसह दिल्ली, मुंबई आणि कोलकता येथे मिळून २० ठिकाणी छापे टाकले. यावेळी ८० लाखांची रोख रक्कम, १.२४ कोटींचे विदेशी चलन, १.३१ कोटींचे सोने, १४ कोटी रुपये किमतीची मालमत्ता, सुमारे १०० विविध बनावट कंपनीचे रब्बर स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत. पैसे वळविण्यासाठी वापरलेली ४०० हून अधिक बँक खाती गोठविण्यात आली आहेत. याच दरम्यान ईडीने २१ आॅगस्ट रोजी मुंबई आणि गोव्यात टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ३.२५ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त केले. यात सिंडिकेटने तब्बल २७ हजार कोटींचे व्यवहार बँकिंग चॅनेलद्वारे तर सुमारे ३ हजार कोटींचे व्यवहार रोखीने केल्याचे उघड झाले आहे. याच दरम्यान ‘ईडी’ने २३ ऑगस्ट रोजी मुंबईत कारवाई करून मुख्य सूत्रधार फहीम सय्यद व नईम सय्यद या दोघांना अटक केली. त्यानंतर ईडीने आतापर्यंत मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट भूषण मोये याच्यासह शैलेश चव्हाण आणि विलास पवार यांना अटक करून कारवाई केली. याच दरम्यान मुख्य संशयित फहीम सईदच्या कंपन्यांमध्ये रोख रकमेच्या बदल्यात आरटीजीएस एन्ट्री पुरवण्याचे काम करणारा मुकेश कुमार पुखराज जैन याची माहिती समोर आली. तसेच जैन हा मुख्य हवाला ऑपरेटर आहेत. त्याची ईडीने चौकशी केली असता, जैन याने दरमहा सुमारे २५० कोटी रुपयांच्या बनावट एन्ट्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सायबर तक्रारींमुळे बँकांची खाती गोठवली जात होती, त्यावेळी लाच व विविध मार्गांनी ही खाती पुन्हा कार्यरत करण्याचे कामही जैन करत असल्याचे समोर आले. त्यानुसार, ईडीने १६ रोजी त्याला अटक केली.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
ईडी कोठडीसाठी जैन याला शनिवार, १७ रोजी मेरशी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीचे विशेष अभियोक्ता सिद्धार्थ सामंत यांनी युक्तिवाद केला. त्यात मुकेश जैनने तपासात सहकार्य न करता अनेक सिमकार्ड आणि मोबाईल फोन नष्ट केल्याचे समोर आले आहे. त्याने क्लोनिंगद्वारे डेटा नवीन फोनमध्ये हस्तांतरित केला, व्हीपीएन वापरले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी फोन इतर व्यक्तींकडे सोपवल्याचा युक्तिवाद केला. याची दखल घेऊन न्यायालयाने त्याला तीन दिवसांची ईडीची कोठडी मंजूर केली.


