म्हापसा: अस्नोडा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नरेंद्र उर्फ बादल सिंग (२१, सध्या रा. पेडणे) याने मेरशी येथील न्यायालय संकुल इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर गंभीर जखमी नरेंद्रचा रात्री साडेअकरा वाजता बांबोळी येथील जीएमसीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एस्कॉर्ट पोलीस पोहोचण्यापूर्वीच संशयिताने हे टोकाचे पाऊल उचलल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये आणि कायदेशीर वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा यापूर्वी जामिनावर मुक्त झाला होता. मात्र, पोक्सो न्यायालयात खटल्याच्या सुनावणीवेळी सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारच्या सत्रात बादल सिंग आपल्या वकिलासह न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यासाठी एस्कॉर्ट पोलिसांना पाचारण केले. परंतु एस्कॉर्ट पथक पोहोचण्यापूर्वीच संधी साधून बादल सिंग न्यायालय संकुलाच्या पाचव्या मजल्यावर गेला आणि तिथून त्याने खाली उडी मारली.
या भीषण घटनेत त्याच्या हात-पायांसह शरीराच्या इतर अवयवांना गंभीर दुखापत झाली. उपस्थितांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले आणि त्याला जीएमसीत दाखल केले, जिथे उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.
हे संपूर्ण प्रकरण ११ ऑक्टोबर २०२३ रोजी घडलेल्या अपहरणाशी संबंधित आहे. पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पीडितेला अस्नोडा येथील एका घरात डांबून ठेवल्याचे समोर आले, जिथे पोलिसांनी छापा टाकून तिची सुटका केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखीचा फायदा घेत आरोपी बादल सिंग आणि त्याच्या साथीदारांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी म्हापसा पोलीस ठाण्यात भादंवि, बाल कायदा आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली होती व डिसेंबर २०२३ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.