फातोर्डा मतदारसंघातून साडेचार हजार मतदारांची नावे वगळली: विजय सरदेसाई

फातोर्डा मतदारसंघातील एसआयआर प्रक्रियेत साडेचार हजार मतदारांची नावे वगळून कुडतरीतील ५० मतदारांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
फातोर्डा मतदारसंघातून साडेचार हजार मतदारांची नावे वगळली: विजय सरदेसाई

मडगाव: फातोर्डा मतदारसंघातील विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेवर आमदार तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अत्यंत गंभीर आक्षेप घेतला आहे. मतदारयादीतून तब्बल साडेचार हजार पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली असून, मागील दोन निवडणुकांत कुडतरी मतदारसंघात मतदान केलेल्या ५० मतदारांची नावे फातोर्डा मतदारसंघात बेकायदेशीरपणे जोडण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हा प्रकार थेट 'मतचोरी'चा असून भाजप राजकीय दबावातून हा प्रकार करत असल्याचा आरोप करत सरदेसाई यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना विजय सरदेसाई यांनी सांगितले की, आगामी फेब्रुवारी २०२७ मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या एसआयआर प्रक्रियेवरून तीव्र वाद निर्माण झाला आहे. ज्या मतदारांनी २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कुडतरी मतदारसंघात मतदान केले होते, त्यांची घरे आजही कुडतरीतच आहेत. असे असतानाही त्यांना तेथून न वगळता थेट फातोर्डा मतदारसंघाच्या यादीत नोंदवण्यात आले आहे. कुडतरी मतदारसंघात भाजपला निवडणूक जिंकता येणार नाही, या भीतीनेच तेथील मतदार फातोर्ड्यात आणून समाविष्ट केले जात आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकारात काही सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश असून त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जात आहे, असेही ते म्हणाले.

या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करत विजय सरदेसाई यांनी सर्व मतदारांना आपल्या नावाची मतदारयादीत त्वरित पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. जर पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली गेली तर त्यांच्या मूलभूत मतदानाच्या अधिकारावर गदा येईल आणि त्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांच्या लाभापासूनही वंचित राहावे लागू शकते, असे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते आता स्वतः घराघरांत जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची नावे मतदारयादीत कायम आहेत की वगळली गेली आहेत, याची प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत.

दरम्यान, मतदारयादीतील या कथित फेरफारप्रकरणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची निश्चित कालमर्यादेत निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यावर योग्य पावले न उचलल्यास या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा स्पष्ट इशाराही आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.


हेही वाचा
सर्व पहा