शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदल्याच्या आमिषाने ३९.०१ लाख रुपयांचा गंडा

सायबर विभागाकडून अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
16th October, 11:04 pm
शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदल्याच्या आमिषाने ३९.०१ लाख रुपयांचा गंडा

पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून बार्देश तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला ३९.०१ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला.

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बार्देश तालुक्यातील ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्याला अनन्या या महिलेने ८७६३१४६८७६ आणि ७६५७०१७४३६ या व्हॉट्सॅप क्रमांकावरून संपर्क साधून शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवले. याच दरम्यान ७३९५८०७९७९ या क्रमांकावरून डेल्टा नामक महिलेने तसेच इतर क्रमांकावरून संशयिताने तक्रारदाराला संपर्क केला. तसेच त्याला ‘ए ८३ डीआय वेल्थ ग्रोथ सेंटर’ या व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदार सदर ग्रुपमध्ये सहभागी झाला. तिथे अनेकांनी शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोबदला मिळल्याचे सांगून तक्रारदाराला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर तक्रारदाराला शेअर ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास लावले. त्या अॅपद्वारे तक्रारदाराला विविध बँकेच्या खात्यात सुमारे ३९ लाख १ हजार ०४७ रुपये जमा करण्यास भाग पाडले. तक्रारदाराने जमा केलेली रक्कम वाढत असल्याचे दाखवण्यात आले. तसेच त्याने केलेल्या गुंतवणुकीत त्याला मोठा मोबदला मिळाल्याचे दाखवले. त्यानंतर तक्रारदाराने सदर रक्कम काढण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याला शुल्क म्हणून आणखी रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यावेळी त्याला संशय आल्यामुळे त्याने वरील अॅपची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात तक्रार दाखल केली.

याची दखल घेऊन सायबर विभागाने अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकाविरोधात भा. न्या. संं.च्या ३१८(४), ३१९(२) आणि आर ड्ब्ल्यू ३(५) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अॅप बनावट असल्याचे उघड

तक्रारदाराने गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधला असता, त्याला शुल्काच्या नावाखाली आणखी रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्याला संशय आला. त्यानंतर त्याने संबंधित ॲपची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली.

हेही वाचा
सर्व पहा