तारक आरोलकरचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

तोरसेतील जमीन विक्रीच्या नावे ४१.८५ लाखांची फसवणूक प्रकरण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
15th October, 11:45 pm
तारक आरोलकरचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

म्हापसा : तोरसे-पेडणे येथील जमीन विक्रीच्या बहाण्याने मुरगावातील महिलेची ४१ लाख ८५ हजार ७५० रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात साईच्छा डेव्हलपर्सचा मालक तारक मंगेश आरोलकर (रा. म्हापसा) याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी हा आदेश दिला.
न्यायालयाने ५० हजार रुपयांचा वैयक्तिक हमी बाँड आणि तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार सादर करण्याची अट घातली आहे. तसेच दर शुक्रवारी म्हापसा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे आणि तक्रारदार किंवा साक्षीदारांशी संपर्क साधून दबाव न आणण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रथमदर्शनी प्रकरण कागदोपत्री पुराव्यांवर आधारित असून, तपासासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. एफआयआरमधील मजकुरावरून प्रकरण दिवाणी स्वरूपाचे वाटत असल्याचेही न्यायालयाने म्हटले. संशयिताच्या वतीने न्यायालयात ज्येष्ठ वकील अॅड. एस. एस. कंटक व नेहा खोलकर यांनी बाजू मांडली. तर सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सोमनाथ कर्पे व सोनाली गावकर यांनी युक्तिवाद केला.
जमिनीच्या व्यवहारातून फसवणुकीचा आरोप
तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये तोरसे येथील ५१,५६० चौरस मीटर जमीन विकण्याचे आमिष दाखवून आरोलकरने तक्रारदाराच्या आईकडून ४१.८५ लाख रुपये घेतले. मात्र, जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा पैसे परत केले नाहीत, असा आरोप आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) आणि ३१८(३) अन्वये गुन्हा नोंदवला. म्हापसा जलदगती न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोलकरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.      

हेही वाचा
सर्व पहा