म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लबला बनावट आरोग्य ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे उत्पादन शुल्क परवाना मिळवल्याच्या प्रकरणात सहमालक अजय गुप्ता यांना म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने सशर्त नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने एक लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार सादर करण्याची अट घातली आहे.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने पुढील तीन सुनावण्यांना उपस्थित राहणे, खटल्यात सहकार्य करणे, साक्षीदारांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क न साधणे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश न सोडणे, अशा अटी घातल्या आहेत.
गुप्ता यांच्या वकिलांनी तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाल्याचा तसेच कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचा युक्तिवाद केला. गुप्ता हे केवळ निष्क्रिय गुंतवणूकदार भागीदार असल्याचे आणि त्यांनी यापूर्वी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले नसल्याचेही बचाव पक्षाने सांगितले. सरकारी पक्षाने मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जामिनाला विरोध केला.
कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांच्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी हे प्रकरण दाखल केले होते. दुसऱ्या आस्थापनाला दिलेले आरोग्य ना-हरकत प्रमाणपत्र बनावटरीत्या बदलून उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी वापरल्याचा आरोप गुप्ता यांच्यावर आहे. त्यांना २३ डिसेंबर २०२५ रोजी अटक झाली होती.
उच्च न्यायालयाने रद्द केला होता जामीन
७ फेब्रुवारी २०२६ रोजी कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता; मात्र गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी तो रद्द केला. सर्वोच्च न्यायालयानेही ३१ ऑगस्ट रोजी त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी गुप्ता न्यायालयात शरण आले होते. आता नव्याने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.


