पणजी : दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथे नुसी वॉकहार्ट हॉस्पिटलच्या जागी ईएसआय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा उपलब्ध असतील. त्यापैकी २५ जागा गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी, तर उर्वरित २५ जागा ईएसआय कर्मचाऱ्यांसह इतर विद्यार्थ्यांसाठी असतील. या महाविद्यालयाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारच्या निधीतून केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
केंद्र सरकारने ५० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे गोव्यात एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ होणार आहे. आपल्या कारकिर्दीत राज्यात दुसरे महाविद्यालय स्थापन होणे ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी २३७ जागा
गोव्यात सध्या बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे. पोर्तुगीज राजवटीतील हे महाविद्यालय पणजी येथे होते. त्यानंतर ते बांबोळी येथील मोठ्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी दरवर्षी २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यापैकी २१२ जागा गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी, तर ३८ जागा अखिल भारतीय कोट्यातून भरल्या जातात.
आता कुंकळ्ळी येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयात आणखी ५० जागा उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी २५ जागा गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. त्यामुळे पुढील वर्षापासून राज्यातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण ३०० जागा उपलब्ध होतील. यापैकी २३७ जागा गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी असतील.
नुसी हॉस्पिटलची इमारत ताब्यात घेणार
कुंकळ्ळी येथील नुसी वॉकहार्ट हॉस्पिटलची इमारत सध्या रिकामी आहे. ही इमारत ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ईएसआय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
डॉक्टरांची कमतरता दूर करण्यास मदत
राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि राज्याला आणखी एका वैद्यकीय महाविद्यालयाची गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत यापूर्वी अनेकदा घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, आता हे महाविद्यालय कुंकळ्ळी येथील नुसी वॉकहार्ट हॉस्पिटलच्या जागी सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


