पणजी : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोव्यातील कांदोळी आणि इतर भागांतील व्हिलांवर टाकलेल्या धडक छाप्यात तब्बल ९०० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. देशाभरातील हजारो लोकांची विविध माध्यमांतून फसवणूक करून लुटलेला कोट्यवधी रुपयांचा निधी अवघ्या काही सेकंदांत हजारो बनावट बँक खात्यांमध्ये वर्ग करण्याचे (मनी लाँड्रिंग) काम अनेक तरुण कांदोळी आणि इतर ठिकाणांवरील व्हिलांमधून अत्यंत हायटेक पद्धतीने करत होते.

जुलै २०२६ मध्ये मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज टिळक रौशन यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दक्षिण मुंबईतील मशिद बंदर येथील पार्श्वनाथ चेंबर्समधील एका कार्यालयावर धाड टाकण्यात आली. तेथे ‘जी. डी. ओव्हरसीज’ नावाची एक कागदावरच अस्तित्वात असलेली बोगस कंपनी चालवली जात होती, जिचे काम मुंबईतील विविध बँकांमध्ये बोगस करंट अकाउंट्स उघडणे हे होते. तेथून अटक करण्यात आलेला संशयित मोहम्मद शबीर शेख याच्या चौकशीत या नेटवर्कचे मुख्य धागेदोरे गोव्यातील आलिशान व्हिलांशी जोडलेले असल्याचे समोर आले. त्याला दुबईत 'रणवीर कपूर' नावाच्या व्यक्तीने भेटून प्रति बँक खाते ५० ते ७० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून मुंबईत पाठवले होते.

या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी गोव्यातील कांदोळी येथील ‘कासा दी निकोल’ या आलिशान व्हिलावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप तेजाणकर यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला. बाहेरून केवळ एक शांत दिसणाऱ्या या इमारतीत आतमध्ये २४ तास चालणारे एक हायटेक कॉर्पोरेट ऑफिस तयार करण्यात आले होते. तीन शिफ्ट्समध्ये काम करणारे १२ तरुण १५ लॅपटॉप, १२८ एटीएम कार्ड, ८५ मोबाईल फोन, ७६ सिम कार्ड, २२ चेकबुक आणि ७७ पासबुकच्या साहाय्याने लुटलेले पैसे एका क्लिकवर हजारो ‘म्युल’ (बोगस) खात्यांमध्ये पाठवत असत. या नेटवर्कशी जोडलेली ७,५०० बँक खाती गोठवून पोलिसांनी १२० कोटी रुपये जप्त केले असून, या एकाच व्हिलामधून ५०० कोटी रुपये वळवल्याचा संशय आहे.

तपासादरम्यान पोलिसांना या गुन्हेगारी सिंडिकेटची एक अत्यंत गुंतागुंतीची रचना आढळून आली. या सिंडिकेटच्या प्रमुख स्थानी दुबईस्थित मुख्य सूत्रधार होता, तर गोव्यातून काम करणाऱ्या प्रशासकांनी ५० लाख रुपये देऊन ही फ्रँचायझी विकत घेतली होती. पैसे ट्रॅक होण्यापासून वाचवण्यासाठी आणि पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी या टोळीने ‘बँकर पॅनेल’ नावाचे विशेष ॲप विकसित केले होते. या ॲपद्वारे एका क्लिकवर काही सेकंदांत पैसे हजारो खात्यांत विखुरले जात असत.

नंतर हे पैसे 'अंगडिया' नेटवर्कद्वारे अवैध मार्गाने पुन्हा दुबईला पाठवले जात असत. या तपासात व्हॉट्सॲप ग्रुप्सवर 'अश्वत्थामा' नावाच्या एका रहस्यमय व्यक्तीचा शोध घेत पोलिसांनी जयपूरमधून बुआ स्मिथ याला अटक केली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी पोतदार यांनी गोव्यातील ‘सी कोस्ट’ या दुसऱ्या व्हिलावर छापा टाकून आणखी १० जणांना अटक करत ४०० कोटींचे बेकायदेशीर व्यवहार उघडकीस आणले. सायबर गुन्हेगार आता क्रिप्टो वॉलेटचा वापर करून असा पैसा श्रीलंका आणि चीन यांसारख्या देशांत पाठवत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.


