पणजी: गोव्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, फोंडा तालुक्यात एका कार्यक्रमादरम्यान वीजमंत्री सुदिन ढवळीकरांनी राजकीय घडामोडींवर पत्रकारांशी बोलताना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परखड भूमिका मांडली. सार्वजनिक बांधकाम खाते (PWD) आणि वीज विभाग यांच्या कामगिरीसह राज्यातील सत्तांतराच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेविषयी विचारले असता, त्यांनी आपण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (MGP) निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले. वैयक्तिक पातळीवर 'ते' पद मिळवण्याची इच्छा असली तरी प्रत्येक इच्छेचे फलित होईलच असे नसते, असे सांगत त्यांनी संघटनात्मक कामाला प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार केला.
गोव्याच्या राजकीय इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, राज्यातील मतदारांनी मगो पक्षाचा १७ वर्षांचा सुवर्णकाळ पाहिला आहे. त्यानंतरच्या काळात काँग्रेस पक्ष, विविध राजकीय पक्षांमध्ये झालेली तोडफोड आणि त्यातून घडलेली सत्तांतरे, तसेच सध्याचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकाळही जनतेने जवळून अनुभवला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याला कोणत्या दिशेने न्यायचे, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे.
विशेषतः आगामी निवडणुकीत तरुण पिढी आणि ५० वर्षांखालील मतदारांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या ५० वर्षांत विविध सरकारांनी केलेले काम जनतेसमोर स्पष्ट आहे. त्यामुळे राज्यात योग्य राजकीय निर्णयाची किंवा बदलाची आवश्यकता आहे की नाही, हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार ५० वर्षांखालील तरुण मतदारांचाच आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असले तरी, अखेर सत्तेची गुरुकिल्ली आणि नेतृत्वाचा अंतिम निर्णय राज्यातील जनताच घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


