पणजी : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोव्याला नवरात्रीची भेट दिली आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या ५० जागा मंजूर केल्या आहेत. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या या जागा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे गोव्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढणार असून, डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर गोव्याला मिळालेली ही भेट असून, राज्यातील इच्छुक वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नव्या आशेचा किरण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नवीन वैद्यकीय महाविद्यालयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ वाढवण्यास आणि आरोग्यसेवांना बळकटी देण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गोव्यात वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या या नव्या महाविद्यालयामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार आहे.


