जयपूर : अपहरणाच्या संभाव्य धोक्याचा अलर्ट मिळाल्यानंतर फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय विमान बुधवारी जयपूरकडे वळवण्यात आले. विमानातून आंतरराष्ट्रीय स्तरावर अपहरण किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप दर्शवणारा ‘७५००’ हा ट्रान्सपॉन्डर कोड प्रसारित होत असल्याची माहिती अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी) दिली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. (An Air India flight from Frankfurt to Delhi diverted to Jaipur after the aircraft transmitted code 7500, indicating a potential hijacking.)
मिळालेल्या माहितीनुसार, एआय २०३० या विमानाचे जयपूर विमानतळावर सकाळी सुमारे ९.३५ वाजता सुरक्षित लँडिंग झाले. त्यानंतर विमानाला स्वतंत्र ‘आयसोलेशन बे’मध्ये नेण्यात आले. या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून विमानाची तपासणी करण्यात आली. विमानातील प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आले.
विमानाला सुरक्षा यंत्रणांकडून हिरवा कंदील
विमानतळ सूत्रांच्या माहितीनुसार, तपासणीनंतर विमानतळ समितीने विमानाला उड्डाणासाठी मंजुरी दिली. प्रवाशांना पुन्हा विमानात बसवण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. या घटनेमुळे विमानतळावरील नियमित कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
काय आहे ‘७५००’ कोड?
‘७५००’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ट्रान्सपॉन्डर कोड आहे. विमानाचे अपहरण किंवा अन्य प्रकारचा बेकायदेशीर हस्तक्षेप होत असल्याची परिस्थिती दर्शवण्यासाठी या कोडचा वापर केला जातो. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला हा कोड प्राप्त झाल्यानंतर संबंधित सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले जाते आणि परिस्थितीची पडताळणी केली जाते.
या प्रकरणात विमानातून हा कोड प्रसारित होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रत्यक्ष अपहरणाचा धोका होता की तांत्रिक अथवा अन्य कारणामुळे हा अलर्ट जारी झाला. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेच्या वेळी एअर इंडियाकडूनही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नव्हते.


