कोची : सुमारे १९ वर्षांपूर्वी केरळमधील एका शांत गावात घडलेल्या हत्याकांडाचा गुंता अखेर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उकलला आहे. वर्ष २००७ मध्ये पेरिंथलमन्ना येथील एका सॉ-मिलचे मॅनेजर बालकृष्णन यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून लाकडाच्या भुशाखाली त्यांचा मृतदेह लपवण्यात आला होता. या घटनेनंतर पसार झालेल्या संशयितांनी आपली खरी ओळख, नाव आणि ठिकाण बदलून कायद्याच्या हातांना तब्बल दोन दशके चकवा दिला. मात्र, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी तो कायम लपून राहू शकत नाही, हे केरळ गुन्हे शाखेने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सिद्ध करून दाखवले आहे.
नेमके प्रकरण काय ?
बिहारमधील अरारिया जिल्ह्यातील दबरा गावचा रहिवासी असलेला दिलीप रजक आणि त्याचा साथीदार सनिचर बैटा हे दोघे आसाममधील काम सोडून केरळमध्ये आले होते. त्यांनी आपली खरी नावे लपवून अनुक्रमे उमेश आणि विनोद अशी बनावट नावे सांगत पेरिंथलमन्ना येथील सॉ-मिलमध्ये काम मिळवले. या काळात सॉ-मिलच्या शेजारी असलेल्या एका बँकेत दरोडा टाकण्याचा निष्फळ प्रयत्न झाला होता. हा प्रकार मॅनेजर बालकृष्णन यांनी पाहिल्याचा संशय आल्याने, २७ डिसेंबर २००७ रोजी त्यांची हत्या करून दोघेही पसार झाले. तपासात सुरुवातीला पोलिसांच्या हाती केवळ बनावट पत्ते आणि सार्वजनिक पे-फोनवरून बिहारमधील त्यांच्या गावी केलेले फोन कॉल्स एवढेच धागेदोरे लागले होते.
गांडिव सिस्टीम आणि एआय फेस मॅपिंग ठरले गेमचेंजर
वर्ष २०१५ मध्ये हे प्रकरण केरळ गुन्हे शाखे वर्ग करण्यात आले, मात्र आरोपी वारंवार ठिकाण आणि फोन नंबर बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. या तपासाला खरा टर्निंग पॉईंट मिळाला तो केंद्र सरकारच्या 'नॅटग्रिड' अंतर्गत कार्यरत असलेल्या 'गांडिव' (Gandiva) या एआय-आधारित सर्च इंजिनमुळे. पोलिसांनी दिपकच्या १९ वर्षे जुन्या फोटोला एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाढत्या वयानुसार म्हणजेच 'एजिंग प्रोसेस'नुसार रूपांतरित केले. या डिजिटल फोटोच्या मदतीने डेटाबेस चाळला असता, दिलीपच्या नावावर असलेल्या एका छुप्या सिम कार्डचा सुगावा लागला. त्याने गेल्या काही वर्षांत १५ पेक्षा जास्त वेळा सिम कार्ड बदलले होते, मात्र तो अत्यंत मोजकेच कॉल्स करत असे.
एआयने शोधून काढलेल्या फोनच्या टॉवर लोकेशनचा मागोवा घेत केरळ गुन्हे शाखेचे चार सदस्यांचे पथक तातडीने आसाममधील धेमाजी जिल्ह्यात पोहोचले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका राईस मिलवर धडक कारवाई करत ६५ वर्षीय दिलीप रजकला ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे तब्बल १९ वर्षे पोलिसांना गुमराह करणाऱ्या आरोपीची तुरुंगाच्या गजाआड रवानगी झाली आहे. या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी सनिचर बैटा हा अद्याप फरार असून, त्यालाही लवकरच जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे जाळे पसरले आहे.


