सावधान! साहित्य ‘होम डिलिव्हरी’च्या नावाखालीही आता सायबर भामट्यांकडून फसवणूक

हैद्राबाद येथील महिलेला ‘ड्रायफ्रूट्स होम डिलिव्हरी’च्या नावाखाली २.६० लाखांना लुटले; ‘ड्रायफ्रूट्सच्या होम डिलिव्हरी’च्या नावाखाली सायबर भामट्यांनी एका वृद्ध महिलेची तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना सनथनगर परिसरात घडली. इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलून ऑनलाईन ऑर्डर करणे महिलेला चांगलेच महागात पडले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th October, 10:05 am
सावधान! साहित्य ‘होम डिलिव्हरी’च्या नावाखालीही आता सायबर भामट्यांकडून फसवणूक

हैद्राबाद : ‘ड्रायफ्रूट्सच्या होम डिलिव्हरी’च्या नावाखाली सायबर भामट्यांनी एका वृद्ध महिलेची तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना सनथनगर परिसरात घडली. इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलून ऑनलाईन ऑर्डर करणे महिलेला चांगलेच महागात पडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला इन्स्टाग्रामवर ड्रायफ्रूट्सच्या होम डिलिव्हरीची जाहिरात दिसली. तिने १,७०० रुपयांचे ड्रायफ्रूट्स ऑर्डर करून त्याचे ऑनलाईन पेमेंट केले. त्यानंतर तिला संबंधित क्रमांकावरून फोन आला. पार्सल कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे पाठविण्यात येईल आणि यापूर्वी भरलेले १,७०० रुपये परत केले जातील, असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

यानंतर भामट्याने महिलेला एक क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितले. क्यूआर कोड स्कॅन करताच तिच्या बँक खात्यातून २१ हजार ७०० रुपये वजा झाले. याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित रक्कमही परत केली जाईल, असे सांगत आरोपीने पुन्हा दुसरा क्यूआर कोड पाठविला. तो स्कॅन केल्यानंतर आणखी ४३ हजार रुपये खात्यातून वजा झाले.

अशाच प्रकारे वारंवार क्यूआर कोड पाठवून महिलेकडून ते स्कॅन करून घेण्यात आले. या प्रक्रियेद्वारे सायबर भामट्यांनी तिच्या खात्यातून एकूण २ लाख ६० हजार रुपये लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर क्राईम पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा