इंदूर : एखाद्याच्या बॅंक खात्यात अचानक काही हजार किंवा लाख रुपये जमा झाले तर त्याला धक्का बसेल. मात्र, सकाळी झोपेतून उठताच मोबाईलवर ३४ कोटी रुपये जमा झाल्याचा संदेश आल्यास तुम्ही काय करणार? इंदूरच्या एका ज्येष्ठ वकिलासोबत हा प्रकार खरोखरच घडला. त्यांच्या बॅंक खात्यात नीफ्टच्या माध्यमातून ३४ कोटी ३२ लाख ९४ हजार रुपये एवढी रक्कम जमा झाली. (Lawyer wakes up to message of 34 crore deposited in bank account). एवढी मोठी रक्कम खात्यात कशी जमा झाली या विचाराने त्यांना धक्काच बसला.
याच विचारात असताना काही वेळाने बॅंकेचा फोन आला आणि एकूण प्रकाराची चौकशी सुरू झाली. या चौकशीत एवढी मोठी रक्कम एखाद्या व्यावसायिक किंवा खासगी व्यक्तीकडून नव्हे तर चक्क नॅशनल हायवे अथाॅरिटी ऑफ इंडियाकडून (NHAI) आल्याचे स्पष्ट झाले. इंदूरचे वकील अजय बागडिया यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. नॅशनल अथाॅरिटी ऑफ इंडिया या संस्थेसोबत वकील काम करतात. त्या संस्थेकडून ही रक्कम जमा झाल्याचे उघड झाले.
७ नोव्हेंबर २०२६ रोजी हा प्रकार घडला. त्यानंतर सखोल चौकशीनंतर प्रोजेक्ट मॅनेजरच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे उघड झाले. त्यानंतर वकिलाला पैसे परत पाठवण्याची विनंती करण्यात आली. ॲड. अजय बागडिया यांनी ९ नोव्हेंबर रोजी एनएचएआय या संस्थेला रक्कम परत पाठवली. ३४ कोटी रुपये एवढी रक्कम नजरचुकीने वकिलाच्या खात्यात जमा झाली याची चौकशी सुरू आहे. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, याप्रकरणातील दोषी व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे.


