नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी जय शहा यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ( Jay Shah gets second term as ICC chairman, elected unopposed). सोमवारी बाली येथे झालेल्या आयसीसीच्या बोर्ड बैठकीत संचालकांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जागतिक क्रिकेटच्या नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा जय शाह यांच्याकडे आली आहे.
आयसीसीच्या संचालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल जय शहा यांनी आभार व्यक्त केले. क्रिकेटचा जागतिक स्तरावर विकास करणे आणि सदस्य देशांच्या हितासाठी काम करणे, ही आपली प्राथमिकता राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
क्रिकेटसाठी आगामी काळ अत्यंत महत्त्वाचा आणि संधींनी भरलेला असल्याचे सांगत त्यांनी २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटच्या पुनरागमनाचा विशेष उल्लेख केला. ऑलिम्पिकमुळे क्रिकेटला नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि नव्या पिढीला या खेळाकडे आकर्षित करण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी जय शहा यांनी जागतिक क्रिकेटमध्ये आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. २०२४ मध्ये ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. त्यांनी ग्रेग बार्कले यांच्यानंतर या पदाची सूत्रे स्वीकारली होती. आता दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वावर आयसीसीने पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.
जय शहा यांचा क्रिकेट प्रशासनातील प्रवास २००९ मध्ये अहमदाबाद येथील सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेटपासून सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१३ मध्ये वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव झाले. २०११ मध्ये त्यांचा बीसीसीआयच्या विपणन समितीत समावेश झाला होता.
गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करताना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमच्या भव्य पुनर्बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे हेच मैदान नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून ओळखले जाऊ लागले. तब्बल १ लाख ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना आणि यंदाच्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला.
यानंतर जय शहा यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्षपदही भूषवले. ते एसीसीचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले. २०२२ मध्ये त्यांच्याकडे आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या प्रवासानंतर त्यांनी जागतिक क्रिकेटच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत मजल मारली. आता दुसऱ्या कार्यकाळात क्रिकेटचा ऑलिम्पिकमधील प्रवेश आणि जागतिक विस्तार यावर त्यांचे विशेष लक्ष असणार आहे.


