मेजवानीच्या अतिरेकाने स्वादुपिंडाला धोका! मद्यपानासोबत जड जेवण ठरू शकते जीवघेणे

डॉक्टरांचा इशारा; ॲसिडीटी आणि पोट फुगण्याचा त्रास होतो. मात्र, अतिप्रमाणात मद्यपान आणि काही आरोग्यविषयक समस्या यांची जोड मिळाल्यास हा त्रास गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अशा वेळी तीव्र स्वादुपिंडदाह (अक्यूट पॅनक्रियाटायटिस) होण्याचा धोका असतो. ही स्थिती वेळेत उपचार न मिळाल्यास जीवघेणी ठरू शकते.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14th November, 10:03 am
मेजवानीच्या अतिरेकाने स्वादुपिंडाला धोका! मद्यपानासोबत जड जेवण ठरू शकते जीवघेणे

नवी दिल्ली : हिवाळा आणि सणासुदीचा काळ सुरू झाला की खाण्यापिण्याच्या मेजवान्यांना उधाण येते. चमचमीत पदार्थ, तेलकट आणि चरबीयुक्त जेवण, गोडधोड तसेच मद्यपानाचे वाढते प्रमाण यामुळे अनेकदा अपचन, ॲसिडीटी आणि पोट फुगण्याचा त्रास होतो. मात्र, अतिप्रमाणात मद्यपान आणि काही आरोग्यविषयक समस्या यांची जोड मिळाल्यास हा त्रास गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अशा वेळी तीव्र स्वादुपिंडदाह (अक्यूट पॅनक्रियाटायटिस) होण्याचा धोका असतो. ही स्थिती वेळेत उपचार न मिळाल्यास जीवघेणी ठरू शकते, असा इशारा गॅस्ट्रो सायन्सेस विभागाचे वरिष्ठ संचालक आणि विभागप्रमुख डॉ. विनीत कुमार गुप्ता (ग्रेटर नोयडा, उत्तरप्रदेश)  यांनी दिला आहे. (Doctor explains how overeating and drinking can cause acute panceatitis, shares warning signs). 


स्वादुपिंडदाह म्हणजे नेमके काय?

स्वादुपिंड हा शरीरातील महत्त्वाचा अवयव असून अन्नपचनासाठी आवश्यक एन्झाइम्स तसेच रक्तातील साखर नियंत्रित करणारे इन्सुलिन यांसारखे हार्मोन्स तयार करण्याचे काम करतो. मात्र, पचनासाठी तयार होणारे एन्झाइम्स स्वादुपिंडातच सक्रिय झाल्यास या अवयवाच्या ऊतींना इजा पोहोचते आणि सूज निर्माण होते. या स्थितीला तीव्र स्वादुपिंडदाह म्हणतात.

पित्ताशयातील खडे आणि अतिप्रमाणात मद्यपान ही या आजाराची प्रमुख कारणे आहेत. विशेषतः कमी वेळेत मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यास काही व्यक्तींमध्ये या आजाराचा धोका वाढू शकतो. चरबीयुक्त पदार्थांमुळे पचनाचा त्रास वाढू शकतो; मात्र केवळ जास्त जेवण केल्याने थेट स्वादुपिंडदाह होतोच असे नाही, असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.

रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे वाढलेले प्रमाण, काही औषधे, चयापचयाशी संबंधित विकार, संसर्ग आणि अनुवंशिक कारणांमुळेही हा आजार होऊ शकतो. यापूर्वी स्वादुपिंडदाहाचा त्रास झालेल्या किंवा पित्ताशयात खडे असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

साधी ॲसिडीटी समजून दुर्लक्ष करू नका!

सामान्य अपचन आणि तीव्र स्वादुपिंडदाह यामध्ये फरक ओळखणे महत्त्वाचे आहे. अपचनामध्ये पोट फुगणे, ढेकर येणे, पोट भरल्यासारखे वाटणे किंवा काही काळ अस्वस्थता जाणवते. मात्र, स्वादुपिंडदाहामध्ये पोटाच्या वरच्या भागात तीव्र आणि सतत वेदना होतात. या वेदना अनेकदा पाठीच्या दिशेनेही पसरतात.

तीव्र स्वादुपिंडदाहाची प्रमुख लक्षणे :

पोटाच्या वरच्या भागात सतत तीव्र वेदना.

वारंवार उलट्या होणे.

मळमळ आणि ताप येणे.

पोटाला स्पर्श केल्यावर वेदना जाणवणे.

हृदयाचे ठोके वाढणे.

जेवणानंतर पोटदुखी अधिक तीव्र होणे.

सामान्य ॲसिडीटीप्रमाणे या आजाराची लक्षणे साध्या अँटासिड औषधांनी किंवा आहारात बदल केल्याने सहसा कमी होत नाहीत. पोटाच्या वरच्या भागात तीव्र किंवा सतत वेदना होत असल्यास, त्यासोबत उलट्या, ताप किंवा पोटाला स्पर्श केल्यावर वेदना जाणवत असल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले.

आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?

स्वादुपिंडाचे आरोग्य जपण्यासाठी संतुलित आहार घेणे, मद्यपान मर्यादित ठेवणे आणि कमी वेळेत मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे टाळणे आवश्यक आहे. तसेच रक्तातील ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे. पित्ताशयात खडे असलेल्या किंवा यापूर्वी स्वादुपिंडदाहाचा त्रास झालेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तपासण्या आणि उपचार करून घ्यावेत.

सणासुदीच्या मेजवानीचा आनंद घेताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. साधे अपचन समजून तीव्र पोटदुखीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

हेही वाचा
सर्व पहा