संगमेश्वर : देवदर्शनासाठी श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे आलेल्या सांगली जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या कड्यावरून मोठा दगड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील आणि चुलते गंभीर जखमी झाले आहेत. रुत्वी संदीप पाटील (वय ६, रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत मुलीचे नाव आहे.
वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील संदीप पाटील हे आपल्या कुटुंबासह श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. दुपारी एकच्या सुमारास संपूर्ण कुटुंब मंदिर परिसरात असताना अचानक डोंगराच्या उंच कड्यावरून एक मोठा दगड निसटून खाली कोसळला. दगड थेट अंगावर आदळल्याने रुत्वीचा जागीच अंत झाला. या दुर्घटनेत तिचे वडील संदीप पाटील आणि चुलते देखील गंभीर जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे कापूसखेड गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, देवस्थानचे स्वयंसेवक आणि संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने मार्लेश्वर परिसरात राज्यभरातून हजारो भाविक आणि पर्यटक येत आहेत. मात्र, या भागात डोंगरावरून दगड आणि दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या धोकादायक कड्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे.


