पणजी : प्रवाशांना बसमध्ये घेण्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसन दोन बसचालकांमधील हिंसक हाणामारीत झाले. पणजी बसस्थानकावर खासगी बस आणि कदंब महामंडळाच्या बसचालकांमध्ये (Kadamba Transport Corporation Ltd) हा प्रकार घडला. या वादादरम्यान दगडफेक करण्यात आल्याने कदंबच्या इलेक्ट्रिक (ईव्ही) बसची पुढील काच फुटून चक्काचूर झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना बसमध्ये घेण्यावरून दोन्ही बसचालकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र, हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याच दरम्यान एका बसवर दगड भिरकावण्यात आला. त्यामुळे कदंबच्या ईव्ही बसच्या पुढील काचेचे मोठे नुकसान झाले.
बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी दोन चालकांमधील वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचल्याने या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रकार
कदंब बसस्थानकावर प्रवासी घेण्यावरून नेहमीच वाद सुरू असतात. त्यातून अर्वाच्च शिव्या देणे, खटके उडणे व अधूनमधून व मोठे भांडणही होत असते. त्यातून प्रवाशांनाही वेठीस धरण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना वेळेत कार्यालयात पोहोचण्याच अडचणी निर्माण होत असल्याची माहिती काही नियमित प्रवाशांनी दिली.


