काणकोण तालुक्यातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे हैराण

रस्त्यांवर भटक्या गुरांची संख्या वाढल्याने अपघातात वाढ

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
15th November, 11:27 pm
काणकोण तालुक्यातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे हैराण

पैंगीण : वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे काणकोण तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार पूर्णपणे हैराण झाले आहेत. या प्राण्यांचा बंदोबस्त करून पिकांचे रक्षण करण्यासाठी सरकारला निवेदन देण्याकरिता स्थानिक शेतकरी आणि बागायतदारांनी सह्यांची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष गावकर यांनी दिली.
संतोष गावकर यांनी सांगितले की, काणकोणच्या मुख्य रस्त्यांवर सध्या भटक्या आणि मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून, अपघातांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे.
जंगले ओस पडल्याने वन्यप्राण्यांनी आता गावांकडे मोर्चा वळवला आहे. तालुक्यात उरल्यासुरल्या शेतीचे आणि बागायतीचे रानडुक्कर, गवारेडा आणि वानर मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. ऐन कापणीला आलेल्या भातशेतीची नासाडी होत असून नारळ, सुपारी, काजू, केळी आणि फळभाज्यांच्या बागांमध्ये या प्राण्यांनी हैदोस घातला आहे. विशेषतः वानरांची संख्या प्रचंड वाढली असून, ते घरांची कौले फोडून थेट घरात शिरून नासधूस करत आहेत. खोतीगाव, आमोणे, शिशेव्होळ आणि खरेगाळ या भागांबरोबरच आता पैंगीण आणि लोलये भागातही वानरांचा उपद्रव वाढला आहे.
एकीकडे तांदूळ, नारळ आणि दुधाचे दर गगनाला भिडले असताना, स्थानिक पातळीवर पीक घेणे कठीण झाल्याने अनेक बागायतदारांनी कंटाळून आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकण्यास सुरुवात केली आहे. महापूर किंवा अवर्षणाच्या काळात सरकारकडून नुकसान भरपाई जाहीर होते, मात्र शेतकऱ्यांच्या हातात अत्यंत तुटपुंजी रक्कम पडते. या सर्व प्रकारामुळे हतबल झालेल्या शेतकरी वर्गाने आता नुकतीच कृषी खात्याची जबाबदारी स्वीकारलेले मंत्री संकल्प आमोणकर यांची भेट घेऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा
सर्व पहा