माणुसकीचा अनोखा प्रत्यय; जखमी कुत्र्याला दिला व्हीलचेअरचा आधार

कुत्र्याला मिळाली पुन्हा चालण्याची संधी : कुटुंबीयांचे प्रेम, वेळसावचे पंच, स्वयंसेवी संस्थेचे प्रयत

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
15th November, 09:00 pm
माणुसकीचा अनोखा प्रत्यय; जखमी कुत्र्याला दिला व्हीलचेअरचा आधार

वास्को : माणुसकीला कोणत्याही प्रजातीची मर्यादा नसते, याचा प्रत्यय वेळसाव येथे आला आहे. अपघातात मागील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने हालचाल करणे अशक्य झालेल्या एका श्वानाला त्याचे पालन पोषण करणाऱ्या कुटुंबीयांनी आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने खास व्हीलचेअर उपलब्ध करून दिली आहे. या मानवीय उपक्रमामुळे त्या श्वानाला पुन्हा आपले आयुष्य उत्साहात जगणे शक्य झाले आहे.

कोविड महामारीच्या काळात हा श्वान वेळसाव गावात आला होता. सुरुवातीला एका स्थानिक कुटुंबाने त्याला खायला घालण्यास आणि त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. कालांतराने या कुटुंबाचे आणि श्वानाचे नाते घट्ट होत गेले आणि घरातील एका सदस्याप्रमाणेच त्याच्यावर जिवापाड प्रेम केले जाऊ लागले.
मात्र, दुर्दैवाने झालेल्या एका अपघातात श्वानाच्या मागील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याची हालचाल पूर्णपणे खंडित झाली. श्वानाची ही दयनीय अवस्था पाहून संबंधित कुटुंबातील महिलेने मदतीसाठी वेळसावचे पंच सदस्य जिम डिसोझा यांच्याशी संपर्क साधला. डिसोझा यांनी तत्परता दाखवत एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या प्रतिनिधींनी कुटुंबाची भेट घेऊन श्वानाच्या परिस्थितीची पाहणी केली. सुरुवातीला त्याला विशेष उपचारासाठी भोपाळ येथील निवारा केंद्रात हलविण्याचा सल्ला संस्थेने दिला होता.
अनेक वर्षांपासून कुटुंबाचा एक भाग बनलेल्या त्या श्वानापासून दूर जाण्याची कुटुंबीयांची अजिबात तयारी नव्हती. त्यांच्यातील हे भावनिक नाते लक्षात घेऊन संस्थेनेही दुसरा पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्या श्वानासाठी खास तयार करण्यात आलेली चाकांची व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली.
अखेर स्वत:च्या ‘पायां’वर झाला स्वार
या व्हीलचेअरमुळे मागील पायांची साथ सुटलेली असतानाही आता त्या श्वानाला पुन्हा स्वतःच्या पायावर (चाकांवर) उभे राहून परिसर संचार करणे शक्य झाले आहे. स्थानिक पंचायतीचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि संवेदनशील ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा स्तुत्य उपक्रम यशस्वी झाला आहे. कुटुंबीयांसाठी ही व्हीलचेअर केवळ हालचालीचे साधन नसून, आपल्या लाडक्या सदस्याला आपल्याच जवळ ठेवून त्याचे आयुष्य सुसह्य करण्याची एक संधी ठरली आहे.

हेही वाचा
सर्व पहा