मडगाव : कोलवा समुद्रकिनाऱ्यावरून २२ वर्षीय तरुणीचे चाकूचा धाक दाखवून अपहरण करत तिच्याकडे २० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघा संशयितांना दक्षिण गोवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले. या संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. वेर्णा आणि वास्को पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. तरुणीने प्रसंगावधान राखत संशयितांच्या नकळत नातेवाइकांना लाईव्ह लोकेशन पाठवल्याने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाले.
मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असलेली आणि सध्या गोव्यात वास्तव्य करणारी ही तरुणी शुक्रवारी संध्याकाळी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. यावेळी सांकवाळ येथील तिघा संशयितांनी तिला गाठले. चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि कोन्सुवा जंक्शनजवळील एका निर्जनस्थळी नेले. तेथे संशयितांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली.
सुरुवातीला घाबरलेल्या तरुणीने स्वतःची सुटका करून घेण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून चार हजार रुपये ऑनलाइन पाठवले. मात्र, एवढ्यावर संशयितांचे समाधान झाले नाही. त्यांनी आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली. त्यामुळे तरुणीने प्रसंगावधान राखत संशयितांना कोणताही संशय येऊ न देता आपल्या मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन नातेवाइकांना पाठवले.
दुचाकीच्या क्रमांकावरून संशयितांचा माग
तरुणीकडून लाईव्ह लोकेशन मिळताच नातेवाइकांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत आयुष यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि स्थानिक पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर वेर्णा पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयितांचा शोध घेत पाठलाग सुरू केला.
पोलिसांची चाहूल लागताच संशयित दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्या दुचाकीचा नोंदणी क्रमांक अचूक टिपला. या क्रमांकाच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बिर्ला आणि सांकवाळ परिसरात विविध पथके तैनात केली. संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवून पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या घटनेत एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याने पोलिसांकडून त्यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीचे अपहरण करून खंडणी मागण्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन तासांत कारवाई; कोलवा पोलिसांकडून तपास
तरुणीच्या नातेवाइकांनी दिलेली माहिती, लाईव्ह लोकेशन आणि दुचाकीचा नोंदणी क्रमांक या आधारे पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. वेर्णा आणि वास्को पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अवघ्या दोन तासांत तिन्ही संशयितांना पकडण्यात यश आले. या प्रकरणी कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


