जोयडा : खानापूर तालुक्यातील इटगी गावाचा गोवा कदंबकालीन इतिहासाशी असलेला प्राचीन संबंध आता नव्याने चर्चेत आला आहे. येथील प्रसिद्ध कमल नारायण देवालय परिसरात आढळलेल्या इ.स. १०६२ च्या सुमाराच्या ऐतिहासिक शिलालेखाच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील इतिहास संशोधकांच्या एका विशेष पथकाने शुक्रवारी इटगीला भेट देऊन गावातील विविध ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय स्थळांची सखोल पाहणी केली. या दौऱ्यात गोव्याच्या कदंब राजवटीतील ऐतिहासिक संदर्भ, प्राचीन मंदिरांची स्थापत्यशैली, शिलालेख आणि दुर्मिळ अवशेषांची महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्यात आली. गोव्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र केरकर, पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. वरद सबनीस, विठोबा गावडे, प्रुडंट मीडियाचे प्रमोद फोंडे आणि वेदांत परोडकर यांचा या अभ्यास दौऱ्यातील पथकात समावेश होता.

क्षेत्रीय अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी संशोधकांच्या पथकाने गावातील 'अरिवु केंद्र', ग्रामपंचायतीचे डिजिटल ग्रंथालय आणि माहिती केंद्राला भेट देऊन गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक वारसा आणि उपलब्ध दस्तऐवजांची माहिती घेतली. त्यानंतर पथकाने हलशी आणि गोवा कदंबांच्या काळात उभारण्यात आलेल्या श्री कमल नारायण मंदिराला भेट दिली. याशिवाय मलप्रभा नदीच्या मध्यभागी असलेले श्री शंकरलिंग मंदिर, नदीकाठचे श्री रामलिंगेश्वर मंदिर, श्री कल्लेश्वर मंदिर, कलमठातील जुने मंदिर आणि परिसरातील विविध शिलालेख व पुरातत्त्वीय अवशेषांची पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि स्थानिक इतिहास संशोधक डॉ. बाहुबली हंदूर यांनी संशोधकांना या ऐतिहासिक स्मारकांची सविस्तर माहिती दिली.

या अभ्यास दौऱ्यादरम्यान बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, इटगी आणि खानापूरचे ऐतिहासिक संबंध थेट गोव्याशी जोडलेले असून गोव्याच्या कदंब राजवटीतील राजा जयकेशी यांच्याशी संबंधित असलेले इटगी गाव ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. तर पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. वरद सबनीस यांच्या मते, मलप्रभा नदीतील शंकरलिंगेश्वर मंदिर आणि परिसरातील पुरातत्त्वीय वस्तू आपल्याला गोव्याच्या कदंब इतिहासाकडे नेतात आणि या वारशाचा अभ्यास सुरू आहे.

इटगीतील कमल नारायण देवालय परिसरातील प्राचीन दगडांमध्ये पडून असलेला एक दगडी तुकडा बाहेर काढल्यानंतर त्यावर हा शिलालेख कोरलेला असल्याचे निदर्शनास आले. इ.स. १०६२ च्या सुमाराचा हा शिलालेख गोवा कदंब राजा जयकेशी यांच्या कालखंडाशी संबंधित असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. या शिलालेखाचा वरचा भाग काहीसा तुटलेला असला तरी उपलब्ध भागावर हळगन्नड भाषेतील २१ ओळी स्पष्टपणे दिसतात, तर संपूर्ण शिलालेखावर सुमारे ५६ ओळी असाव्यात असा अंदाज आहे. विशेष म्हणजे, यातील मजकुराचे इटगीतील हनुमंत मंदिर परिसरात यापूर्वी सापडलेल्या संस्कृत ताम्रपटांतील उल्लेखांशी साधर्म्य आढळते. या ताम्रपटांमध्ये तत्कालीन इटगीचा उल्लेख कलगिरी प्रांतातील अग्रहार म्हणून, तसेच 'इट्टीगे' किंवा 'इष्टिगे' असा करण्यात आला आहे.

कमल नारायण मंदिरातील सुमारे आठ फूट उंचीची भव्य नारायण मूर्ती या परिसराच्या प्राचीन कलात्मक आणि धार्मिक वैभवाची साक्ष देते. राजा जयकेशी यांच्या काळात या मंदिराची उभारणी झाल्याचे प्राथमिक संदर्भांतून स्पष्ट होते. इटगी परिसरातील हे शिलालेख, मंदिरे, मूर्ती आणि पुरातत्त्वीय अवशेषांचा एकत्रित अभ्यास केल्यास गोवा कदंब राजवटीचा खानापूर परिसराशी असलेला ऐतिहासिक दुवा अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या अमूल्य ऐतिहासिक ठेव्यांचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन आणि संवर्धन करण्याची नितांत गरज व्यक्त होत आहे.


