वझरी-पेडणे येथे ४.३० लाखांची चोरी, अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

सोनसाखळी, रोख रकमेची चोरी; आगाऊ रकमेचा अपहार : भेंडाळे-वझरी येथील नाना शेट इमारतीत सोन्याची साखळी व रोख रक्कम चोरीला गेल्याप्रकरणी, तसेच आगाऊ दिलेल्या रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरून पेडणे पोलिसांनी (Pernem Police station) दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
वझरी-पेडणे  येथे ४.३० लाखांची चोरी, अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

पेडणे : भेंडाळे-वझरी येथील नाना शेट इमारतीत सोन्याची साखळी व रोख रक्कम चोरीला गेल्याप्रकरणी, तसेच आगाऊ दिलेल्या रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरून पेडणे पोलिसांनी (Pernem Police station)  दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आशिक अँथनी आणि नेहा अँथनी अशी संशयितांची नावे आहेत. दोघेही केरळचे रहिवासी आहेत.

भेंडाळे-वझरी येथील सिद्धेश प्रताप भेंडाळकर यांनी पेडणे पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत हा प्रकार घडला. भेंडाळकर यांनी दोघांपैकी एकाला वाहनचालक म्हणून कामावर ठेवले होते, तर दुसऱ्याकडे रंग व हार्डवेअरच्या दुकानातील काम सोपवले होते. वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने ४५ हजार रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने सोन्याचे लॉकेट असलेली साखळी आणि १० हजार रुपये रोख रक्कम चोरले. तसेच आगाऊ दिलेल्या ७५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सोन्याच्या दागिन्याचे वजन अंदाजे २० ते ३० ग्रॅम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कामानिमित्त ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन दोघांनी हा प्रकार केल्याचा आरोप भेंडाळकर यांनी केला आहे. या प्रकरणात एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा