‘अकवान’ चक्रीवादळाची तीव्रता आज वाढणार; आंध्रप्रदेशमध्ये धडकणार

१४५ किमी वेगाने वाहणार वारे; तीन आठवड्यांत तिसरे चक्रीवादळ : मुसळधार पावसाचा अंदाज; उत्तर भारतात थंडीचा कडाका; बद्रीनाथमध्ये नदीचे पाणी गोठले दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
‘अकवान’ चक्रीवादळाची तीव्रता आज वाढणार; आंध्रप्रदेशमध्ये धडकणार

अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अकवान’ चक्रीवादळ येत्या दोन दिवसांत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या चक्रीवादळाबाबत गंभीर इशारा दिला आहे. वादळाच्या प्रभावामुळे ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी १४५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. १९ नोव्हेंबरच्या रात्री हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश, ओडिशा आणि तमिळनाडूमध्ये २१ नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळपर्यंत तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी आलेल्या ‘अर्नब’ आणि ‘मुरासु’ या चक्रीवादळांनंतर अवघ्या तीन आठवड्यांत आंध्र प्रदेशला प्रभावित करणारे ‘अकवान’ हे तिसरे चक्रीवादळ ठरणार आहे.

७ हजार कोटींच्या पिकांचे नुकसान

मागील दोन चक्रीवादळांमुळे राज्यातील सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे.

डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पावसामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथे बर्फवृष्टीनंतर तापमान उणे ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. त्यामुळे नदीचे पाणीही गोठू लागले आहे.

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि बिहारसह आठ राज्यांमध्ये मंगळवारी सकाळी दाट धुके पसरले होते. ‘अकवान’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या राज्यांमध्येही २० आणि २१ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकीकडे देशातील अनेक भागांत थंडी वाढत असताना राजधानी दिल्लीत वायुप्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. मंगळवारी या हंगामातील आतापर्यंतची सर्वांत थंड सकाळ नोंदवण्यात आली. सफदरजंग येथे किमान तापमान ११.६ अंश सेल्सिअस होते, जे सामान्य तापमानापेक्षा ०.७ अंशांनी कमी आहे. थंडीबरोबरच दिल्लीतील हवेची गुणवत्ताही खालावली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता शहराचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) २३८ नोंदवण्यात आला. हा निर्देशांक खराब श्रेणीत येतो. सिरिफोर्ट परिसरात सर्वाधिक ३३३ AQI नोंदवण्यात आला. 

हेही वाचा
सर्व पहा